India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात गोलंदाजी करताना सिराजने दमदार कामगिरी केली आहे. संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला वर्कलोडमुळे या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या हाती होती. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली. त्याच्याकडून एक झेल सुटला, पण गोलंदाजीत त्याने भरपाई करून काढली. त्याची गोलंदाजी पाहून इंग्लंडचा अनुभवी खेळाडू जो रूटने देखील त्याचं कौतुक केलं आहे.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजची दमदार कामगिरी
या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात देखील जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. या सामन्यातही सिराजने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. आता या सामन्यात देखील सिराज गोलंदाजीत चमकला आहे. चौथ्या दिवसाच्या शेवटी त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी पूर्ण जोर लावला. पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने ४ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद केले आहेत. यासह अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफीत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रमही सिराजच्या नावावर आहे. या कामगिरीने त्याने सर्वांचं मन जिंकलं आहे.
सिराज एक योद्धा आहे
चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बोलताना जो रूट म्हणाला की,” सिराज असा खेळाडू, जो परिस्थिती कशीही असो पण आपल्या संघासाठी लढतो. मैदानावर असताना तो संघासाठी सर्वकाही करतो. कधी कधी मैदानावर तो राग व्यक्त करतो, पण तो मनाने खूप चांगला आहे. तो खूप मेहनती आहे. त्यामुळे त्याच्याकडे इतक्या विकेट्स आहेत.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “सिराजसारख्या खेळाडूविरूद्ध खेळताना नेहमीच मजा येते. तो नेहमीच हसत देशासाठी सर्वकाही करण्यासाठी तयार असतो. अशा खेळाडूंना पाहून नक्कीच युवा खेळाडूंना खूप शिकायला मिळेल.” सिराज या मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांवर चांगलाच भारी पडला आहे. या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सिराज अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत २० गडी बाद केले आहेत. एकाच मालिकेत २० गडी बाद करण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाही त्याने २० गडी बाद केले होते.