इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान हेलिकॉप्टर मैदानात उतरल्याने एकच खळबळ उडाली. कोणतीही पूर्वकल्पना न देता हेलिकॉप्टर उतरल्याने गोंधळ उडाला. यामुळे जवळपास २० मिनिटं सामना थांबवावा लागला. डरहम आणि ग्लॉस्टरशायर या संघादरम्यान सामना सुरु असताना ही विचित्र घटना घडली. डरहमने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिलं षटक सुरु असताना हेलिकॉप्टर मैदानात लँड करण्यात आलं. यामुळे सामना थांबवण्यात आला. सोशल मीडियावर हेलिकॉप्टर लँडिगचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायर होत आहे.

“मैदानाजवळ एक गंभीर घटना झाल्याने ग्रेट वेस्टर्न एअर रुग्णवाहिका मैदानात उतरली होती. वेगाने मदत पोहोचण्यास यामुळे मदत झाली. काम व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर आता खेळ सुरु झाला आहे.”, असं ट्वीट ग्लॉस्टरशायर क्रिकेटने केलं आहे.

दुसरीकडे मैदानात केलेल्या इमरजन्सी लँडिंगप्रकरणी ए ग्रेट वेस्टर्न एअर अम्ब्युलन्सने दिलगिरी व्यक्त करत ट्वीट केलं आहे. “खेळात बाधा आणल्याने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्हाला अनऑर्थोडॉक्स फिल्डिंग बघता आली. बाकी खेळासाठी तुम्हाला शुभेच्छा”, असं ट्वीट ए ग्रेट वेस्टर्न एअर अम्ब्युलन्सने केलं आहे.

या प्रसंगाचं समालोचन करताना समालोचकांनी महेंद्रसिंह धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची आठवण काढली. “आता पुढे आम्हाला एमएस धोनीचा हेलिकॉप्टर शॉट्स बघायला आवडेल.”, असं समालोचकांनी सांगितलं.