Akash Chopra and Harsha Bhogle Criticism on Henry Blofeld : एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा झालेला पराभव अजूनही लोकांना पचवता आलेला नाही. टीम इंडियाच्या पराभवावर काही लोक आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. त्याचवेळी क्रिकेट जगतातील प्रसिद्ध समालोचक हेन्री ब्लोफेल्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर भारतीय संघाविषयी असे काही बोलले, ज्यानंतर आता त्यांना भारतीय समालोचकांचा रोष सहन करावा लागत आहे. भारताचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले आणि आकाश चोप्रा यांनी आता इंग्लंडचे समालोचक हेन्रीला खडे बोल सुनावले आहेत.

टीम इंडियाबद्दल हेन्री काय म्हणाला?

विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर हेन्री ब्लोफेल्ड यांनी एक्सवर पोस्ट केले की, “माझ्यासाठी ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकण्यापेक्षा आणखी काही रोमांचक नाही. या पराभवामुळे भारताचे कोणतेही नुकसान होणार नाही. कारण ते त्यांच्या बुटाच्या हिशोबाने जास्त मोठे होत चालले होते.” त्याच्या पोस्टचा अर्थ भारतीय संघाचा अपमान करणे असा होता. त्यानंतर भारतीय समालोचकांनी हेन्रीला धारेवर धरले. त्यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

हर्षा भोगले आणि आकाश चोप्राने सुनावले खडे बोल –

हेन्री ब्लोफेल्डच्या पोस्टला उत्तर देताना, भारतीय समालोचक हर्षा भोगले यांनी लिहिले, “जेव्हा मी पहिल्यांदा इंग्लंडला जायला लागलो होतो, तेव्हा मला अशाच मानसिकतेचा सामना करावा लागला होता. आमची पुढची पिढी बदल घडवून आणत आहे, पण असे निंदनीय लोक आम्हाला तुच्छतेने पाहतात.”

याशिवाय आणखी एक भारतीय समालोचक आकाश चोप्राने हेन्रीला फटकारले आणि लिहिले की, “आम्ही ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर दोन कसोटी मालिकेत पराभूत केले, तेव्हा आम्ही असे म्हटले नव्हते. कारण उत्कृष्टतेचा शोध म्हणजे स्वतःला सोडून इतर कोणाशीही स्पर्धा करणे असा नाही.”

हेही वाचा – Daniel McGahey: आयसीसीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर ‘या’ ट्रान्सजेंडर क्रिकेटरने घेतली निवृत्ती; म्हणाली, “आम्ही खेळाच्या सुरक्षिततेला आणि अखंडतेला…”

८४ वर्षीय समालोचक हेन्री हा क्रीडा पत्रकारितेचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. मोठे क्रिकेटपटूही त्याला फॉलो करतात आणि आतापर्यंत हेन्रीने खेळावर ८ पुस्तके लिहिली आहेत. पण भारतीय संघाबद्दल त्याने असे वक्तव्य करणे, कोणालाच योग्य वाटले नाही.