Romario Shepherd 22 Runs In 1 Ball: वेस्टइंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील १३ वा सामना गयाना अॅमेझॉन वॉरियर्स आणि सेंट लुसिया किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात सेंट लुसिया किंग्ज संघाने ४ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघाने २० षटकांअखेर ६ गडी बाद २०२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सेंट लुसिया किंग्ज संघातील फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली आणि दिलेलं आव्हान १८.१ षटकात पूर्ण करत विजयाची नोंद केली.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघाकडून रोमारियो शेफर्डने ३४ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. यादरम्यान शेफर्डने २१४.७१ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ७ षटकार आणि ५ चौकार मारले. यादरम्यान शेफर्डने या डावातील एकाच चेंडूवर २० धावा वसूल केल्या. तर दुसरीकडे ओशेन थॉमसने एकाच चेंडूवर २२ धावा खर्च करत आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.
थॉमसने एकाच चेंडूवर खर्च केल्या २२ धावा
या सामन्यात असं काही घडलं जे क्रिकेटमध्ये याआधी कधीच घडलं नव्हतं. या सामन्यातील पहिला डाव सुरू असताना ओशेन थॉमस १५ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. यादरम्यान त्याला एक चेंडू टाकण्यासाठी ५ चेंडू टाकावे लागले. षटकातील तिसरा चेंडू टाकताना त्याने २२ धावा खर्च केल्या.
नेमकं काय घडलं?
तर झाले असे की,ओशेन थॉमसने षटकातील तिसरा चेंडू टाकला जो नो चेंडू होता. त्याने फ्री हिटचा चेंडू टाकला, जो वाईड गेला. त्यामुळे त्याला हा चेंडू परत टाकावा लागला. हा चेंडू देखील नो ठरला. फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या शेफर्डने षटकार मारला. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा नो चेंडू टाकला, ज्यावर शेफर्डने षटकार मारला. त्यानंतर त्याने पाचवा चेंडू टाकला, हा चेंडू नो नव्हता. पण हा चेंडूदेखील शेफर्डने सीमारेषेपार पोहोचवला.यासह फलंदाजी करत असलेल्या शेफर्डने एकाच चेंडूवर २० धावा वसूल केल्या. तर ओशेनने या एकाच चेंडूवर २२ धावा खर्च केल्या. या षटकात त्याने एकूण ३३ धावा खर्च केल्या.