पॉल व्हॅन अ‍ॅस यांच्या हकालपट्टीनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी रोलँट ओल्टमन्स यांच्याकडे सोपविण्यात आली. गेली तीन वर्षे उच्च कामगिरी संचालक म्हणून संघासोबत असलेले ओल्टमन्स प्रशिक्षकपदाच्या कार्यभाराचा आरंभ १५ दिवसांच्या युरोप दौऱ्यापासून करणार आहेत. या दौऱ्यासाठी संघाचे नेतृत्व सरदार सिंगकडेच सोपविण्यात आले असून मुंबईच्या युवराज वाल्मीकीला संघातून वगळण्यात आले आहे.
३१ जुलैपासून या दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. या दौऱ्यात भारत फ्रान्सविरुद्ध दोन आणि स्पेनविरुद्ध तीन असे एकूण पाच सामने खेळणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून वर्षांअखेरीस भारतात होणाऱ्या जागतिक हॉकी लीग अंतिम स्पध्रेसाठी संघाच्या तयारीची चाचपणी करता येणार आहे. १९ जुलैपासून शिमला येथे सुरू असलेल्या निवड चाचणी शिबिरातून युरोप दौऱ्याकरिता भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. मध्यरक्षक सरदार सिंग याच्याकडेच संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून गोलरक्षक पी. आर. श्रीजेश उपकर्णधाराची भूमिका पार पाडेल. या संघात दोन गोलरक्षक, सहा बचावपटू, सहा मध्यरक्षक आणि सात आघाडीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. ड्रॅगफ्लिकर व्ही. आर. रघुनाथ, बचावपटू कोथाजित सिंग आणि गुरजिंदर सिंग, मध्यरक्षक एस. के. उथप्पा आणि दानिश मुज्ताबा आणि स्ट्रायकर एस. व्ही. सुनील, मनदीप सिंग, तलविंदर सिंग यांनी संघात पुनरागमन केले आहे. या सर्व खेळाडूंचा बेल्जियममध्ये पार पडलेल्या जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेत संघात सहभाग नव्हता. आघाडीपटू मोह. आमिर खान या एकमेव नव्या चेहऱ्याला संघात स्थान देण्यात आले आहे.
मध्यरक्षक मनप्रीत सिंग, धरमवीर सिंग, निक्कीन थिम्माईआह, सतबिर सिंग, गुरमैल सिंग आणि युवराज वाल्मीकी यांना संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘‘पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे संघात समावेश करण्यात आलेला नाही,’’ असे युवराजने सांगितले. तसेच वरिष्ठ खेळाडू गुरबाज सिंग यालाही मुकावे लागणार आहे. प्रशिक्षण सहकारी यांच्यासोबत गैरवर्तणूक केल्यामुळे गुरबाज विरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्याची शिफारस हॉकी इंडियाने नियुक्त केलेल्या विशेष समितीने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा दौरा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून संघाची कामगिरीचा अभ्यास करता येणार आहे आणि कमकुवत बाबींमध्ये सुधारणा करण्यात मदत मिळणार आहे. जागतिक हॉकी लीग अंतिम स्पध्रेनंतर आमचे लक्ष्य रिओ ऑलिम्पिक असेल. सतत शिकण्याचा प्रयत्न आम्ही सुरूच ठेवणार आहे.
– रेलाँट ओल्टमन्स, प्रशिक्षक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey india appoints roelant oltmans as india coach
First published on: 28-07-2015 at 07:53 IST