चीनमध्ये ऐतिहासिक सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांनी हाँगकाँग सुपर सीरिज स्पर्धेतही दमदार वाटचाल करताना उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. मात्र दुखापतीतून सावरून पुनरागमन करणाऱ्या पी.व्ही.सिंधूला दुसऱ्याच फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.
चीन येथे झालेल्या स्पर्धेत महान खेळाडू लिन डॅनला नमवण्याची किमया करणाऱ्या श्रीकांतने थायलंडच्या तानगोस्क सेइनबुनसूकवर २१-१९, २३-२१ असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये श्रीकांतने १०-२ अशी आघाडी घेतली. ही आघाडी ११-३ अशी वाढवली. मात्र तानगोस्कने दोन गुण मिळवले. त्यानंतर सलग सहा गुणांची कमाई करत ११-१४ अशी पिछाडी भरून काढली. मात्र यानंतर श्रीकांतने झंझावाती खेळ करत पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये श्रीकांत १८-१३ असा आघाडीवर होता. मात्र तानगोस्कने पुन्हा एकदा चिवटपणे खेळ करत पुनरागमन केले. प्रत्येक गुणासाठी रंगलेल्या मुकाबल्यात अखेर श्रीकांतने बाजी मारली.
विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या तिसऱ्या मानांकित सायनाने अमेरिकेच्या बेइवान झांगवर २१-१६, २१-१३ अशी मात केली.पहिल्या गेममध्ये मुकाबला ५-५ असा बरोबरीत होता. मात्र त्यानंतर सायनाने शानदार खेळ करत झांगला निष्प्रभ केले. स्मॅशेस आणि नेटजवळून सुरेख खेळाच्या जोरावर सायनाने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
जपानच्या बिगरमानांकित नोझोमी ओखुहाराने सातव्या मानांकित युवा पी.व्ही.सिंधूला २१-१७, १३-२१, २१-११ असे नमवत खळबळजनक विजयाची नोंद केली. नोझोमीने पहिला गेम जिंकत आश्वासक सुरुवात केली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने लौकिकाला साजेसा खेळ करत बाजी मारली. मात्र तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूच्या कामगिरीतली लय हरवली आणि तिला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.