टेनिसविश्वातला आधुनिक तारा कार्लोस अल्काराझ सध्या युएस ओपन टेनिस स्पर्धेत जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करतो आहे. मात्र त्याच्या दर्जेदार खेळापेक्षा चर्चा त्याची हेअरकटचीच आहे. व्यवस्थित केशसंभार घेऊन खेळणारा अल्काराझ युएस ओपन स्पर्धेत टकलू होऊन कोर्टवर उतरला आणि जगभरात या लूकची चर्चा सुरू झाली. जगभरात चाहता वर्ग असलेल्या अल्काराझच्या या अनोख्या हेअरकटने सोशल मीडियावर कमेंट्ना उधाण आलं. आठ दिवसांनंतरही अल्काराझच्या टेनिसपेक्षा या हेअरकटचीच चर्चा सुरू आहे.

गेल्या आठवड्यात अल्काराझ सिनसिनाटी स्पर्धा खेळून न्यूयॉर्क शहरात दाखल झाला. इमा राडेक्यूबरोबर मिश्र दुहेरीत तो खेळणार होता. त्यावेळी त्याच्या डोक्यावर केस होते. बिली जिन किंग नॅशनल टेनिस सेंटर इथे सरावादरम्यान अल्काराझचा तोच लूक होता. मात्र युएस ओपन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या सामन्यावेळी अल्काराझचा हा वेगळाच अवतार जगासमोर आला. युएस ओपन स्पर्धेत सहभागी झालेला तिओफेन अल्काराझच्या हेअरस्टाईलने चक्रावून गेला. हा हेअरकट भीषण आहे. तो गंमतीशीर दिसतो आहे. तू एअरोडायनॅमिक दिसतो आहेस. त्याला हा हेअरकट कोणी करायला सांगितला माहिती नाही. पण हा अगदीच भयंकर आहे. तरुण तडफदार खेळाडू आहे. दर आठवड्याला त्याचे हेअरकट बदलत असतात. तो केसांचं काय करतो याविषयी चर्चा होते. ट्रेंड होतात. हे सगळं असताना त्याने डोक्यावरचे सगळे केस काढून टाकणं अनोखं आहे. कार्लोस माझा दोस्त आहे, केसांचं काहीही होवो.

टेनिसऐवजी हेअरकटचीच चर्चा होऊ लागल्यानंतर अल्काराझने स्वत:हूनच याचा खुलासा केला. अल्काराझचा भाऊ अल्वारो याच्या हातून ही आगळीक घडली आहे. युएस ओपन सारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी वेगळा हेअरकट करूया म्हणून अल्वारोने अल्काराझचे केस कापायला घेतले. ट्रिमर हातात घेऊन अल्वाराने काम सुरू केलं. मात्र एकाक्षणी आपण अपेक्षेपेक्षा जास्तच केस कापल्याचं अल्वारोच्या लक्षात आलं. यानंतर पूर्ण केस कापणे एवढाच पर्याय हाती उरला होता. कारण जेवढे केस कापलेले तेवढेच ठेवले असते तर ते अर्धवट दिसले असते. त्यामुळे अल्वाराने अल्काराझचं टक्कलच केलं.

अल्वारोला ट्रिमर कसा चालवायचा ते कळलं नाही. तो केस कापत सुटला. जेव्हा घोळ त्याच्या लक्षात आला तोवर उशीर झाला होता. हा लूक इतकाही वाईट नाही, इतका चांगला नाही असं अल्काराझ गंमतीत म्हणाला. अल्काराझने सामना जिंकल्यानंतर चाहत्यांनाही विचारलं, माझा नवीन लूक कसा वाटतोय? चाहत्यांनीही गंमतीशीर प्रतिसाद दिला.