Yashasvi Jaiswal: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज यशस्वी जैस्वाल हा मुंबई संघाकडून डोमेस्टिक क्रिकेट खेळत आला आहे. मात्र मध्यंतरी त्याने मुंबईचा संघ सोडून गोवा क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवले होते. मात्र कालांतराने त्याने आपला निर्णय बदलला. या निर्णयामागे भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा असल्याचे आता समोर आले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी या प्रसंगाचा उलगडा केला आहे. एमसीएकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर २३ वर्षीय यशस्वी जैस्वालने महिन्याभरातच आपला निर्णय बदलला होता. हा निर्णय बदलण्यामागे रोहित शर्मा असल्याचे नाईक म्हणाले.
रोहित शर्माने समजूत काढल्यानंतर यशस्वी जैस्वालने आपला निर्णय बदलला. मुंबई संघाने दिलेल्या संधीमुळेच यशस्वी जैस्वालचा भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
मुंबई मिररशी बोलताना अजिंक्य नाईक यांनी सांगितले की, ज्या मुंबई संघाने तुझे करिअर घडवले, त्या संघाबरोबरच तू राहा, असे रोहित शर्माने यशस्वीला सांगितले. मुंबईच्या संघाने आजवर ४२ वेळा रणजी करंडक जिंकलेला आहे, त्यामुळे या संघाकडून खेळणे हा अभिमान आणि प्रतिष्ठेचा विषय आहे. तसेच मुंबई क्रिकेटमुळेच त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली, विसरू नये. त्यामुळे त्याने या शहराचे आभार मानायला हवेत.
याशिवाय यशस्वी जैस्वालने मुबंईतील काही वरिष्ठ खेळाडूंशी चर्चा केली आणि त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र माघारी घेतले, असेही अजिंक्य नाईक यांनी सांगितले. यशस्वी जैस्वालने ईमेलद्वारे ना हरकत प्रमाणपत्र माघारी घेण्याची विनंती केली, जी आम्ही मान्य केली, असेही नाईक म्हणाले.
यशस्वी जैस्वाल हा मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. क्रिकेटसाठी तो मुंबईत आला. २०१९ साली अतिशय लहान वयात त्याने मुंबई संघातून रणजी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मुंबईसाठी त्याने सात प्रथम दर्जाचे सामने खेळले आहेत.