३१ डिसेंबरची संध्याकाळ आली की सर्वसामान्यांना चाहूल लागते ती सिडनी हार्बर ब्रीजवर नववर्ष स्वागतानिमित्त होणाऱ्या अतिषबाजीची.. पण खरा खुरा क्रिकेटप्रेमी वाट बघत असतो तो सिडनी टेस्टची… गेल्या वर्षाचा शेवट बॉक्सिंग डे टेस्टनी झाल्यावर, क्रिकेट जगताचं वर्ष सुरु होतं ते १०० वर्षाचा इतिहास लाभलेल्या अशा सिडनी स्टेडियमवर. दिवाळीत आपली आजी कशी छान नववारी, नाकात नथ घालून तयार झालेली असते अगदी तसंच हे पारंपरिक सिडनीचं मैदान डौलदारपणे तयार असतं ‘न्यू इयर्स डे टेस्ट’ मॅचसाठी. ऐतिहासिक अशा या स्टेडियमवर भारत अनेक टेस्ट मॅचेस खेळला, एकदाच आपण विजयी झालो पण अनेक आठवणी मात्र ह्या मैदानानी दिल्या. अशीच एक आठवण….. खरंतर नुसती आठवण नाही तर आपल्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडेल अशी शिकवण सिडनी ग्राउंडवरून आपल्याला मिळाली.. त्याचीच ही गोष्ट!

सन २००३-०४, भारताचा ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरु होता. सिरीज १-१ मध्ये बरोबरीत होती, कधी नव्हे ते आपण ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट मॅच जिंकलो होतो. सगळं कसं स्वप्नवत सुरु होतं. पण इंडियन क्रिकेट फॅन्सना टीम परफॉर्मन्सबरोबर वैयक्तिक कामगिरीसुद्धा तेवढीच महत्वाची असते. एखाद्याच्या सेंच्युरीशी त्यांचं इमोशनल अटॅचमेंट असतं. त्या सिरीजमध्ये वैयक्तिक पातळीवर अक्षरशः दिवाळी सुरु होती. आगरकर-कुंबळे ह्यांनी विकेट्स काढल्या होत्या… गांगुली, द्रविड, लक्ष्मण आणि सेहवाग या नावांसमोर खोऱ्यानी धावा लागल्या होत्या. शतकं – द्विशतकंचा पाऊस ह्या महारथींकडून पाडला गेला होता. सगळीकडे कसं छान छान वातावरण होतं, पण….

हो – हो पण! इथेही हा ‘पण’ आलाच… अख्खी दुनिया ही सिरीज जत्रेसारखं एन्जॉय करत असताना एक माणूस मात्र शांतपणे कोपऱ्यात बसून होता. सिरीजमध्ये खेळणाऱ्या २२ लोकांमध्ये अपेक्षांचं सर्वात जास्त ओझं घेणारा तो मात्र शांत आणि निर्विकार चेहरा घेऊन बसून होता. मात्र त्याची निगेटिव्ह बॉडी लँगवेज संपूर्ण टीमला एक पाऊल मागे आणेल ह्याची त्याला कल्पना होती आणि त्यामुळेच मनात असलेली निराशा चेहऱ्यापासून लांब ठेवत होता. तो होता, सचिन रमेश तेंडुलकर. ह्या मालिकेमधल्या आधीच्या टेस्ट्समध्ये त्याच्या नावावर असलेल्या ०,१,३७,०,४४ ह्या निराशाजनक धावसंख्या त्याच्या मनात घर करून राहिल्या होत्या. मेलबर्नहून सिडनीला आल्यावर वर्ष बदललं होतं. सिडनी ब्रीजवर फटाक्यांची आतिषबाजी संपूर्ण विश्वानी बघितली होती. परंतु करोडो भारतीय फॅन्स समोर एकच चिंता लागून राहिली होती “सचिन रमेश तेंडुलकरच्या” बॅटमधून आतिषबाजी कधी होणार??

आपण टॉस जिंकला, पहिली बॅटिंग घेतली. मनात हुश्श झालं..आता ही मॅच हरणार नाही अशी खात्री वाटू लागली. जबरदस्त फॉर्मात असलेल्या सेहवाग-चोप्रा जोडीने पुन्हा एकदा १०० रन्सची ओपनिंग पार्टनरशिप केली. पण दोघेही पाठोपाठ आउट झाले. भारत बिनबाद १२० वरून २ आउट १२८. आता ‘इन फॉर्म द्रविड’ बरोबर ‘आउट ऑफ फॉर्म तेंडुलकर’ अशी जोडी जमली. मॅचच्या रिझल्ट पेक्षा सचिनचा फॉर्म हे एक मोठं टेन्शन फॅन्सच्या डोळ्यात दिसू लागलं. प्रार्थना केल्या गेल्या, मनुष्यरूपी देवासाठी मूर्तीरुपी देवाकडे नवस बोलले गेले. फिंगर्स क्रॉसड … टच वूड… सगळं सगळं करून झालं. सचिनचा पहिला अर्धा तास विलक्षण अवघड होता. एक्सप्रेस हायवेवर प्रचंड खड्डे यावेत असा त्याचा खेळ वाटत होता. त्याच्या फुटवर्कमधून त्याचा ‘फॉर्म’ रिफ्लेक्ट होत होता. पण त्याच्या नजरेतून एक प्रकारचा निर्धार व्यक्त होत होता. त्याचे नेहमीचे फटके बाहेर येत नव्हते.. काहीतरी वेगळं..विचित्र वाटत होतं. पण महत्वाचं हे होतं की तो अजूनही बॅटिंग करत होता. त्याच्या बॅटिंग स्टाईलमध्ये त्यानी केलेला बदल आता स्पष्टपणे दिसायला लागला होता. ते विचित्र वाटणं म्हणजे त्याची स्ट्रॅटेजी होती हे हळू हळू सर्वाना उमगायला लागलं. अख्खी दुनिया नववर्षाच्या पार्टी मूडमध्ये असताना आपला हा देव स्वतःच नक्की काय चुकतंय ह्याचा अभ्यास करत होता. इतकं वर्ष क्रिकेट खेळूनसुद्धा हे अपयश त्यांनी लाइटली घेतलं नव्हतं. केवळ प्रॉब्लेम शोधण्यावर तो थांबला नाही… त्यावरच सोल्युशन घेऊनच तो मैदानात उतरला होता.. ‘आपण एक ग्रेटेस्ट बॅट्समन आहोत’ हे असे विचार मनात येणं हे खूप धोकादायक असतं. पण सचिन आणि जिद्द ह्यांची लहानपणापासूनची घट्ट मैत्री. जिद्दीच्याच जोरावर त्यांनी ह्या सगळ्या विचारांना लांब ठेवलं होतं. स्वतःच्या नावावर हजारो धावा असलेला तो आता मोठ्या धैर्याने बॅक टू व्हेरी बेसिक्स पर्यंत पोचला होता. ऑफ स्टम्प आणि बाहेरच्या चेंडूकडे डुंकून देखील बघायचं नाही …फक्त लेग साईडला आलेल्या चेंडूवर धावा मिळवायच्या…. असा सर्वात डिफेन्सिव्ह अप्रोच त्यानी फॉलो केला.

सुरवातीचा अवघड अर्धा तास तग धरून राहिल्यानंतर हळू-हळू पालवी फुटायला लागली. एक-एक धाव जोडली जाऊ लागली. द्रविड बाद झाल्यावर लक्ष्मण बरोबर जोडी जमली. लक्ष्मण त्याच्या लयीत खेळत होता, एक से एक फ्लिक आणि कट शॉट्सनी पटापट धावा वाढवत होता. अशा वेळेस सचिनसुद्धा त्याचा डिफेन्सिव्ह अप्रोच सोडून पुन्हा त्याचा नैसर्गिक खेळ सुरु करायची शक्यता होती. पण सचिनच तो.. केलेला निर्धार त्यांनी तंतोतंत पाळला… स्वतःच्या मनामध्ये काय करायचं आणि काय काय नाही हे पक्कं फीड केलं होतं. समोर घडणाऱ्या कुठल्याही पॉझिटिव्ह-निगेटिव्ह गोष्टीचा आपल्या प्लॅनिंग वर परिणाम तो करून देत नव्हता. उत्तम रंगकर्मीं कसा भूमिकेत घुसून ते बेरिंग नाटक संपेपर्यंत सोडत नाही तसाच सचिन सुद्धा आज मावळ भूमिकेत शिरला होता आणि खेळ संपेपर्यंत त्यातून जाणूनबुजून बाहेर आला नाही.

पहिला दिवस संपला…दुसरा दिवस संपला……तिसऱ्या दिवशीसुद्धा भारताने बॅटिंग केली. सर्वोच्च ७०५ धावा झाल्यावर आपली इनिंग डिक्लीअर केली. लक्ष्मण १७८ धावा काढून आउट झाला होता. सचिनला पार्थिव पटेल नी छान साथ दिली होती. सगळ्या संकटांवर मात करून, केलेला प्लॅन उत्तम प्रकारे एक्झिक्युट करून सचिनने तब्बल २४१ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनमध्ये बॅटिंगला आलेला सचिन तिसऱ्या दिवशीपर्यंत खेळतच होता. ६०० मिनिटं हा माणूस बॅटिंग करत होता…. १० तास???? आपल्या मनाशी प्रामाणिक राहून, आपली नैसर्गिक शैली बाजूला ठेवून एकदम शिस्तप्रिय विद्यार्थ्यांने होमवर्क पूर्ण करावा तसा ४०० हुन जास्त चेंडून सामोरे गेला. कव्हर ड्राइव्ह, कट शॉट्स, ऑफ ड्राइव्ह हे सगळे शॉट्स म्हणजे फिश फ्रायमधले काटे असल्यासारखं त्यांना बाजूला केलं…. आणि ग्लान्स,फ्लिक ,पूल या सगळ्या लाडक्या मैत्रिणी वाटतील एवढं त्यांना जवळ केलं. त्यानी मारलेल्या ३३ बॉण्ड्रीजपैकी फक्त ४ ऑफसाईड्ला मारल्या होत्या. केवढा तो कंट्रोल आणि केवढी ती शिस्त! त्याच्या ह्याच कष्टाचं फळ त्याला, टीमला आणि असंख्य फॅन्सना मिळालं होतं. त्याचे २०० रन्स झाल्यावर सिद्धिविनायक, दगडुशेठला मोदक ठेवले गेले. आपलीच साडेसाती संपल्यासारखा आनंदसगळ्या फॅन्सच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहायला लागला होता.

दुसऱ्या डावात सुद्धा त्यानी ६० रन्स केल्या, ह्या वेळेस मात्र टीमच्या गरजेप्रमाणे त्यानी आपला पवित्रा बदलला होता. कमीत कमीत वेळेत जास्तीत जास्त रन्स करून ऑस्ट्रेलियासमोर मोठं टार्गेट सेट करायचं होतं. आता मात्र सचिन एकदम ‘सचिन’ सारखाच खेळला. आपण इनिंग डिक्लीयर केली. ऑस्ट्रेलियाला १०० ओव्हर्समध्ये ऑल आउट करायचं आपल्या बॉलर्ससमोर आव्हान होतं. त्याकडे वाटचाल सुरु होती .. जिंकायची संधी आली होती पण पार्थिव पटेलने स्टीव्ह वाचं सोडलेलं स्टंपिंग, त्यानंतर स्टीव्हनी केलेली झुंजार बॅटिंग आणि सिडनीमध्ये अवेळी आलेला पाऊस ह्यामुळे आपण ही मॅच जिंकू शकलो नाही. सिरीज १-१ बरोबरीत राहिली. स्टीव्ह वॉ ची शेवटची सिरीज ही बरोबरीत सुटली होती..पण स्टीव्ह वॉच्या उत्तुंग करियरमधल्या शेवटच्या मॅचवर मात्र एकच नाव कोरलं गेलं ..एकच नाव लक्षात राहिलं…. सचिन रमेश तेंडुलकर!

टेस्ट क्रिकेटची हीच गम्मत असते, मनोरंजनापेक्षा ते खूप काही आपल्याला देऊन जातं. या सामन्याच्या निमित्तानी ते पुन्हा एकदा प्रूव्ह झालं. ५ दिवसाची ही मॅच, आयुष्यभराची शिकवण देऊन गेली. ऑल थँक्स टू मिस्टर गॉड! कसंय ना, नवीन वर्ष सुरु होतं,भिंतीवरच्या कॅलेंडरबरोबरच आपले चाललेले वाईट दिवससुद्धा बदलतील अशी प्रत्येकाला अपेक्षा असते. पण त्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची इच्छा आणि त्याप्रमाणे कृती मात्र कुणी घेताना दिसत नाहीत. नशीब असं आपोआप बदलत नसतं…त्यासाठी आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहून आपल्यातच बदल करावे लागतात. सिडनी ग्राउंडवर साक्षात सचिनने दिलेली ही शिकवण सर्वांच्या आयुष्यभर स्मरणात राहील, आचरणात येईल हीच प्रार्थना…..कारण त्यात आपलंच भलं आहे! सर्व क्रिकेटप्रेमींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!