Mithali Raj On Team India: भारतीय महिला संघ मोठ्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. येत्या ३० सप्टेंबरपासून आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा भारतात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही स्पर्धा अतिशय महत्वाची असणार आहे. भारतीय महिला संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मजबूत संघांपैकी एक आहे. पण भारतीय संघाला अजूनपर्यंत एकदाही वनडे वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे यावेळी मायदेशात खेळताना भारतीय महिला संघाकडे आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफी जिंकून इतिहास घडवण्याची संधी असणार आहे. दरम्यान भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने भारतीय संघाला विजयाचा गुरूमंत्र दिला आहे.
भारतीय संघाला वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकण्यासाठी काय करावं लागेल?
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने आयसीसी डिजिटलवर चर्चा करताना, भारतीय संघ आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धा कशी जिंकू शकतो यावर चर्चा केली. मिताली म्हणाली, ” भारतीय संघाला महत्वाच्या सामन्यांमध्ये मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावं लागेल. सर्वोत्तम संघाला संघात समतोल कसा राखायचा हे चांगलं माहित असतं. ते मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा करून घेतात आणि सामना आपल्या बाजूने वळवतात. भारतीय संघालाही जिंकायचं असेल, तर हेच करावं लागेल.”
भारतीय महिला संघाला आजवर एकदाही आयसीसीची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आता मादेशात भारतीय संघाकडे आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे. याबाबत बोलताना मिताली राज म्हणाली की, ” पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकणं हा देशातील महिला क्रिकेटसाठी एक निर्णायक टप्पा ठरेल. भारतासाठी वनडे वर्ल्डकप जिंकणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्नं असतं. आपण आतापर्यंत हे कधीच करू शकलेलो नाही.”
भारतीय महिला संघ दोन वेळा आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण एकदाही जेतेपदाची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. याबाबत बोलताना मिताली राज म्हणाली, ” हो, आपण दोन वेळा वर्ल्डकप जिंकण्याच्या जवळ पोहोचलो. पण ती ट्रॉफी आपल्या हाती लागलेली नाही. घरच्या मैदानावर ट्रॉफी जिंकणं ही खूप खास गोष्ट असेल. त्यामुळे प्रत्येकाला इतिहास घडताना पाहण्याची संधी मिळेल.” आता भारतीय महिला संघ मायदेशात खेळताना आयसीसीची पहिली ट्रॉफी जिंकणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.