scorecardresearch

IPL 2022 Final: अंतिम सामन्यासाठी गृहमंत्री अमित शाह लावणार हजेरी, सुरक्षेसाठी तब्बल सहा हजार पोलीस तैनात

इंडियन प्रिमीअर लीगचा रोमांच आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात अंतिम सामना रंगणार आहे.

प्रातिनिधीक फोटो

इंडियन प्रिमीअर लीगचा रोमांच आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्याला अनेक सिने कलाकार हजेरी लावण्याची शक्यता आहे. भारताचे गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह देखील हा सामना पाहायला स्टेडियममध्ये जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदाबाद शहरात आणि स्टेडियम परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

अहमदाबाद शहराचे पोलीस आयुक्त संजय श्रीवास्तव यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, येत्या काळात अहमदाबाद शहरात आणि स्टेडियम परिसरात १७ डीसीपी, ४ डीआयजीएस, २८ एसीपी, ५१ पोलीस निरीक्षक, २६८ पोलीस उपनिरीक्षक, ५००० हून अधिक पोलीस शिपाई, १००० होमगार्ड आणि एसआरपीच्या तीन कंपन्या बंदोबस्ताचा भाग असतील.”

२८ मे पासून अमित शाह गुजरात दौऱ्यावर असून राज्यातील विविध उपक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत. दरम्यान ते दोन मंत्र्यांसोबत काही VVIP लोक आणि बॉलीवूड सुपरस्टार यांच्यासमवेत IPL 2022 च्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात अंतिम सामना होणार आहे.

आयपीएल २०२२ चा नवीन संघ गुजरात टायटन्स अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. क्वालिफायर – १ मध्ये दोन्ही संघ आपसात भिडले होते. ज्यामध्ये गुजरातने ने राजस्थान रॉयल्सचा सहज पराभव करत अंतिम सामन्यासाठी आपलं स्थान पक्कं केलं. तर राजस्थानने क्वालिफायर-२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Huge security forces deployed as amit shah attend gt vs rr ipl 2022 final match live update rmm