R Ashwin On Team India Squad For Asia Cup 2025: आगामी आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे कायम आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, या संघात आक्रमक सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलेलं नाही. या दोघांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही,हे पाहूण भारताचा माजी खेळाडू आर अश्विनने नाराजी व्यक्त केली आहे. या दोन्ही खेळाडूंना स्थान न मिळाल्याने तो निराश झाला आहे.
आर अश्विन काय म्हणाला?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर आर अश्विनने आपलं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. या चॅनेलच्या माध्यमातून तो आपली मतं मांडत असतो. आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतरही अश्विनने व्हिडीओ पोस्ट करत आपलं मत मांडलं आहे. यशस्वी जैस्वालला भारतीय संघातून बाहेर करण्याबाबत अश्विन म्हणाला, “जर तुमच्याकडे तिसरा सलामीवीर फलंदाज म्हणून जैस्वाल आहे. तर मग विश्वविजेत्या संघातील फलंदाजाला बाहेर करून तुम्ही शुबमन गिलला स्थान दिलं. गिलला संघात स्थान मिळाल्याचा मला आनंद आहे; पण जैस्वालला स्थान न मिळाल्याचं दुःखही होत आहे.”
श्रेयस अय्यरबाबत बोलताना तो पुढे म्हणाला की, “तुम्ही श्रेयस अय्यरची कामगिरी पाहा. तो संघातून बाहेर पडला पण त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी केली. त्याने स्पर्धा जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. जर गिल दमदार फॉर्ममध्ये आहे, तर श्रेयस अय्यरही दमदार फॉर्ममध्ये आहे. जैस्वालनेही ओव्हलच्या कठीण वाटणाऱ्या खेळपट्टीवर दमदार फलंदाजी केली.
तसेच तो पुढे म्हणाला,” श्रेयस अय्यरची काय चूक आहे? त्याने केकेआरला आयपीएल स्पर्धा जिंकून दिली. त्याला रिलीज करून लिलावात यावं लागलं. त्यानंतर त्याने पंजाबला २०१४ नंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचवलं. त्याने शॉर्ट चेंडूंवर दमदार फटकेबाजी केली. बुमराह आणि रबाडासारख्या गोलंदाजांविरूद्ध खेळताना धावा गोळा केल्या. त्यामुळे जैस्वाल आणि श्रेयससाठी मला खूप वाईट वाटतंय.”