गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अखेर आज आयसीसीने मान्यता दिली आहे. २०१९ च्या विश्वचषकानंतर या स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेत ९ संघ सहभागी होतील. स्पर्धेचा कालावधी दोन वर्षांचा असून त्यामध्ये सहा मालिकांचा समावेश असेल. ऑकलंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

वन-डे सामन्यांप्रमाणेच आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा आराखडा असेल, असं आयसीसीने स्पष्ट केलंय. कसोटी क्रिकेट क्रमवारीतले पहिले ९ संघ सहा कसोटी मालिका खेळतील. यातील ३ मालिका या घरच्या मैदानावर तर ३ मालिका या प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळवल्या जातील. यात प्रत्येक संघाला दोन कसोटी सामने खेळणं आवश्यक असून गरजेनूसार मालिकेत या सामन्यांची संख्या पाचपर्यंत वाढवता येऊ शकते. झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, आयर्लंड या देशांना स्पर्धेतून वगळण्यात आलेलं आहे.

याचसोबत २०२० पासून आयसीसीने वन-डे सामन्यांची लीग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत लीगमध्ये खेळणारे सर्व संघ विश्वचषकात थेट पात्र होण्यासाठी आमनेसामने असतील. २०२३ साली होणाऱ्या वन-डे विश्वचषक लक्षात घेता, दर दोन वर्षांनी वन-डे लीग खेळवण्याचा आयसीसीचा विचार आहे. यानंतर दर तीन वर्षांनी ही लीग खेळवण्यात येईल. या लीगमध्येही प्रत्येक संघाला ८ मालिका खेळाव्या लागणार असून, ४ मालिका या घरच्या मैदानावर तर ४ मालिका या प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. एका वन-डे मालिकेत जास्तीत जास्त ३ वन-डे सामने खेळवण्याची अट असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नवीन लीगमुळे क्रिकेट रसिकांना अधिक चांगल्या पद्धतीने खेळाचा आनंद घेता येणार आहे. याचसोबत या लीगमधून विश्वचषकाला पात्र होता येणार असल्याने या स्पर्धेला वेगळचं महत्व प्राप्त होणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आयसीसी सध्या प्रायोगिक तत्वावर ४ दिवसांचे कसोटी सामने आयोजित करणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे या देशांत ही ४ दिवसांचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ४ दिवसांच्या कसोटी सामन्यांमुळे नवीन संघांना कसोटी खेळण्याची अधिक संधी मिळणार असल्याचे आयसीसीचे सीईओ डेव्हीड रिचर्डसन यांनी सांगितले. त्यामुळे आता आयसीसीच्या या नवीन स्पर्धेला क्रीडा रसिक कसा प्रतिसाद देतात, हे पहावं लागणार आहे.