भारतीय संघाला पराभूत करुन पाकिस्तान संघाने रविवारी ओव्हलच्या मैदानावर एक नवा इतिहास रचला. यंदाच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सर्वाधिक बक्षीसासह त्यांनी या चषकावर नाव कोरले आहे. या सामन्यात फाखर झमानच्या झंजावती शतकानंतर पाकिस्तानी गोलंदाज आमीरच्या गोलंदाजीतील धार देखील पाहायला मिळाली. दुखापतीतून सावरुन आमीर अंतिम सामन्यात मैदानात उतरला होता.  सामन्यापूर्वीच तो भारतीय संघाविरुद्ध आखलेली रणनिती सांगून मोकळा झाला होता. भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी टॉप ऑर्डला लवकरात लवकर बाद करणे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्याने सामन्यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते.

अर्थात शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे यांना लगाम घालण्यावर भर असेल, असा त्याच्या बोलण्याचा रोख होता. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर पाकिस्तानी संघाने आखलेला प्लॅन त्याने जगजाहीर करुन भारतीय संघाला सावध केल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगल्याचे पाहायला मिळाले. अर्थात हा सामना पाकिस्तानने गमावला असता, तर आमीर पुन्हा टिकेचा धनी नक्कीच झाला असता. मात्र, त्याने दुखापतीतून सावरुन पुन्हा मैदानात उतरताना त्याला पाकिस्तानचे अस्त्र का म्हणतात हेच दाखवून दिले. त्याने जो गेम प्लॅन जाहीर केला होता. त्याप्रमाणे त्याने भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीला देखील मैदानात तग धरु दिला नाही. अवघ्या सहा षटकात त्याने २.६७ च्या सरासरीने १६ धावा देऊन भारतीय संघाची प्रमुख फलंदाजांचे कंबरडे मोडले. यात त्याने दोन निर्धाव षटके टाकली. आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धेचे बक्षीस हे सर्वाधिक असल्यामुळे स्पर्धेचे जेतेपद पटकावून श्रीमंत पाकिस्तानी संघ श्रीमंत झाला आहे.  पाकिस्तानी संघाच्या विजयात मोहम्मद आमीरचा वाटा हा महत्त्वपूर्ण असाच आहे.