अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी ३ चेंडूत ९ धावांची गरज होती. अशा वेळी बेन स्टोक्सने मारलेला फटका सीमारेषेवर गेला. चेंडू सीमारेषेवर अडवेपर्यंत स्टोक्स दुसरी धाव घेण्यासाठी निघाला होता. स्टोक्सने दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी झेप घेतली आणि त्याच वेळी सीमारेषेवरून फेकलेला चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागून थेट सीमारेषेपार गेला. त्या घटनेमुळे इंग्लंडला ४ अतिरिक्त धावा मिळाल्या ज्याचा उपयोग सामना ओव्हरपर्यंत नेण्यात झाला.

पाहा या घटनेचा व्हिडीओ…..

घडलेल्या या प्रकाराबाबत बोलताना बेन स्टोक्सने ‘मी या घटनेसाठी न्यूझीलंडची आयुष्यभर माफी मागेन’, असे म्हटले. त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यालाही याबाबत विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, “अशा पद्धतीने चौकार जावा हे थोडेसे वेदनादायी आहे. क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी वेळोवेळी होत असतात. पण तुमच्या बाबतीत असा प्रकार घडू नये अशीच तुमची कायम अपेक्षा असते.”

दरम्यान, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cricket world cup 2019 final eng vs nz overthrow boundary ben stokes kane williamson reaction vjb
First published on: 15-07-2019 at 10:04 IST