अखरेच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानची कडवी झुंज मोडून काढत पाकिस्तानने सामन्यात बाजी मारली आहे. लीड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ३ गडी राखून मात केली. २२८ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी ६ धावांची गरज होती. इमाद वासिम आणि वहाब रियाज जोडीने या धावा पूर्ण करत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह पाकिस्तानचं या स्पर्धेतलं आव्हान अजुनही कायम राहिलेलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याआधी, २२८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात खराब झालेली आहे. विश्वचषक स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक असलेला पाकिस्तानचा संघ अफगाणिस्तानविरोधात संकटात सापडलेला आहे. मोहम्मद नबी आणि मुजीब उर रेहमान यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर पाकिस्तानचे ३ फलंदाज माघारी परतले आहेत. सलामीवीर फखार झमानला मुजीबने पहिल्याच षटकात माघारी धाडत पाकिस्तानला धक्का दिला.

यानंतर इमाम उल-हक आणि बाबर आझम यांनी छोटेखानी अर्धशतकी भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला. मात्र मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात इमाम उल-हक माघारी परतला. यानंतर थोड्याच वेळात बाबर आझम मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. मोहम्मद हाफीजनेही हारिस सोहेलसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला, मात्र मुजीबने त्याला माघारी धाडत पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला. यानंतर हारिस सोहेल आणि कर्णधार सरफराज लागोपाठ माघारी परतला.

पाकिस्तानचा संघ संकटात सापडलेला असतानाच, इमाद वासिम आणि शादाब खान यांनी झटपट धावा काढत अर्धशतकी भागीदारीची नोंद केली. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबच्या गोलंदाजीवर पाकिस्तानने खोऱ्याने धावा काढत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात शादाब खान धावचीत होऊन माघारी परतला. मात्र तळातल्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत पाकच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अफगाणिस्तानकडून मुजीब उर-रेहमान आणि मोहम्मद नबीने प्रत्येकी २-२ बळी घेतले. राशिद खानने १ बळी घेतला.

दरम्यान, शाहीन आफ्रिदी-इमाद वासिम यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर पाकिस्तानने अफगाणिस्तानला २२७ धावांवर रोखण्यात यश मिळवलं आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तानला या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानने दिलेलं आव्हान पाकिस्तानी फलंदाज कसं पूर्ण करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पाकिस्तानकडून शाहीन आणि इमाद यांनी अफगाणिस्तानच्या डावाला खिंडार पाडलं. अफगाणिस्तानकडून असगर अफगाण, नजिबउल्ला झरदान यांनी थोडीफार झुंज दिली.

नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रहमत शाह आणि कर्णधार गुलबदीन नैब यांनी संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. शाहीन आफ्रिदीने नैबला माघारी धाडत अफगाणिस्तानला धक्का दिला. यानंतर अफगाणिस्तानचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. मधल्या फळीत असगर अफगाण, नजिबउल्ला झरदान यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा सामना केला, मात्र त्यांची झुंजही अपयशी ठरली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने ४, इमाद वासिम आणि वहाब रियाझने २ तर शादाब खानने १ बळी घेतला.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cricket world cup 2019 pakistan vs afghanistan leeds psd
First published on: 29-06-2019 at 18:40 IST