मैदानावर खेळाडूंमध्ये होणारे वाद मिटवण्यात तसेच अशी प्रकरणे होऊ नयेत यासाठीच्या उपाययोजनांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) कुचकामी ठरत असल्याचे मत माजी क्रिकेटपटू इयन चॅपेल यांनी व्यक्त केले. जेम्स अँडरसन आणि रवींद्र जडेजा यांच्यात उद्भवलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर चॅपेल बोलत होते. आयसीसीने अशी प्रकरणे टाळण्यासाठी नव्याने विचार करण्याची गरज आहे. मी खेळत होतो तेव्हाही परिस्थिती अशीच होती. खेळाचा विचार करून निर्णय घेतला जात नाही तर अर्थकारण लक्षात घेऊन निर्णय घेतला जातो असे त्यांनी पुढे सांगितले. प्रत्येक संघजिंकण्यासाठीच खेळत असतो. त्यामुळे खेळाडूंमध्ये वाद होऊ शकतात. मात्र ते बोलून सामोपचाराच्या मार्गाने सुटू शकतात. तो वाद त्याच दिवशी बोलून सोडवता येतो. दुसऱ्या दिवशी नव्याने सुरुवात करता येते आणि हीच पद्धत योग्य आहे, असे चॅपेल यांनी सुचवले.