११ षटकारांसह वेगवान शतक; इंग्लंडवर सहा विकेट्स राखून मात
आयपीएलच्या निमित्ताने भारतीय खेळपट्टय़ा आणि वातावरणाला सरावलेल्या ख्रिस गेलने बुधवारी इंग्लिश गोलंदाजांवर निर्विवाद अधिराज्य गाजवले. ‘ट्वेन्टी-२० क्रिकेटचा राजा’ हे बिरूद सार्थ ठरवताना गेलने वादळी फटकेबाजीची नजाकत वानखेडे स्टेडियमवर पेश केली. त्याने एकापेक्षा एक उत्तुंग अशा ११ षटकारांनी मनसोक्त आतषबाजी करीत क्रिकेटरसिकांना ‘पैसा वसूल’ खेळीची अनुभूती दिली. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील दुसरे शतक झळकावून गेलने वेस्ट इंडिजच्या विश्वचषकातील अभियानाचा विजयाध्याय लिहिला.
गेलची खेळी पाहण्यासाठी वानखेडे गाठणाऱ्या चाहत्यांना त्याने मुळीच नाराज केले नाही. त्याच्या ४८ चेंडूंत ५ चौकार आणि ११ षटकारांसह नाबाद १०० धावांच्या खेळीमुळेच वेस्ट इंडिजला इंग्लंडविरुद्ध सहा विकेट्स आणि ११ चेंडू राखून विजय साजरा करता आला. गेलने रिसी टॉपले, अदिल रशीद, मोईन अली आणि बेन स्टोक्स या गोलंदाजांवर हल्ला करीत षटकार खेचले. गेलने मार्लन सॅम्युअल्स (३७) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी रचली. त्यानंतरसुद्धा भागीदाऱ्या झाल्या. परंतु त्यात गेलचाच एकछत्री अंमल होता.
तत्पूर्वी, इंग्लंडने जो रूटच्या धुवांधार फलंदाजीच्या बळावर निर्धारित षटकांत ६ बाद १८२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. इंग्लंडच्या जवळपास प्रत्येक फलंदाजाने वेगाने धावांचे ध्येय बाळगून आपले योगदान दिले. त्यामुळे अनेक छोटय़ा-छोटय़ा भागीदाऱ्या रचल्या.
वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. कारण सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्सने (२८) जेसन रॉयच्या साथीने ३७ धावांची सलामी नोंदवली. रॉय बाद झाल्यावर रूट आणि हेल्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. रूटने ३ चौकार आणि २ षटकारांनिशी ३६ चेंडूंत ४८ धावा केल्या. विंडीजकडून आंद्रे रसेल आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : २० षटकांत ६ बाद १८२ (जो रूट ४८, जोस बटलर ३०, अ‍ॅलेक्स हेल्स २८; आंद्र रसेल २/३६,) पराभूत वि. वेस्ट इंडिज : १८.१ षटकांत ४ बाद १८३ (ख्रिस गेल नाबाद १००, मार्लन सॅम्युअल्स ३७; रिसी टॉपले १/२२)
सामनावीर : ख्रिस गेल.

.. तरी निम्म्याहून अधिक स्टेडियम रिक्त
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सराव सामन्याला ‘हाऊसफुल’ गर्दी करणाऱ्या मुंबईकरांनी वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील लढतीविषयी मात्र उत्सुकता दर्शवली नाही. शनिवारी झालेल्या सराव सामन्याच्या तिकिटांसाठी चाहत्यांनी भल्या मोठय़ा रांगा लावल्या होत्या. भारताच्या सामन्याला चाहते गर्दी करणार, याची पूर्वकल्पना असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने या सामन्याद्वारे लक्षावधी रुपयांची कमाई केली. मात्र विंडीज-इंग्लंड सामन्याला जवळपास निम्म्याहून अधिक स्टेडियम रिक्त होते. ख्रिस गेलच्या प्रेमापोटी हे क्रिकेटरसिक स्टेडियमपर्यंत आले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc t20 world cup gayle hits ton in first match of t20 world cup again
First published on: 17-03-2016 at 03:06 IST