टी-२० विश्वचषकातील ३० व्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ एकमेकांसमोर आले होते. रविवारी पर्थ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज दिली, पण त्याच्या झुंजीला यश आले नाही.

रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या दमदार ६८ धावांच्या योगदानाच्या जोरावर ९ बाद १३३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने एडन मार्करमच्या (५२) आणि डेव्हिड मिलरच्या (५९) शानदार अर्धशतकाच्या जोरावर हे लक्ष्य सहज पार केले. त्याने हे आव्हान १९.४ षटकांत १३७ धावा करत पूर्ण केले.

भारतीय संघाच प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव हा त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. जरी सूर्यकुमारला भारतीय संघात पदार्पण करण्यासाठी विलंब झाला असला, तरी त्याने अल्पावधितच यशाची शिखरे पार केली आहेत. आक्रमक खेळीप्रमाणे दिलदार स्वभावासाठी देखील तो ओळखला जातो.

सूर्या हा त्याच्या आक्रमक खेळीसाठी आणि आपल्या दिलदार स्वभावासाठी ओळखला जातो. तो आज ही आपल्या जुन्या मित्रांना विसरत नाही, तसेच या मित्रांच्या मदतीला नेहमीच धावून जातो. त्याच्या या स्वभावाबद्धल त्याचा मित्र जावेद खानने एक किस्सा सांगितला आहे. ज्यामध्ये सूर्यकुमारने त्याला एक मोठी मदत केली होती.

जावेद खान सांगतो की, ”कोविड नंतर, माझ्यासाठी गोष्टी कठीण होत होत्या आणि मला एक अकादमी उघडायची होती. मला थोडे पैसे हवे होते आणि मी सूर्याला मेसेज केला. सूर्या लगेच मदतीला धावून आला.”

त्याचबरोबर कोरोना महामारीच्या काळात रणजी ट्रॉफीचा माजी सहकारी असलेल्या एका मित्राला कोरोना झाला होता. तेव्हा सुद्धा सूर्याने मदतीचा हात पुढे केला होता. त्याने मित्राच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांची मदत केली होती. सूर्या आपल्या संघर्षाच्या काळात सुद्धा दोन गोष्टी करत राहिला: धावा करणे आणि त्याच्या मित्रांना आणि कुटुंबियांना मदत करणे.

हेही वाचा – T20 World Cup 2022: ‘अपना टाइम आयेगा’, सुपरस्टार बनण्याआधी सूर्यकुमार यादवचं फेव्हरेट होतं हे गाणं