आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेट अधिक रोमांचक करण्यासाठी नवीन खेळाचे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम जून २०२५ पासून लागू होतील. पांढऱ्या चेंडू आणि लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये अनेक नियम बदलणार आहेत, ज्यामुळे गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये बरोबरीची टक्कर पाहायला मिळणार आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, एकदिवसीय सामन्यांमध्ये जुना चेंडू, कन्कशन सब्स्टिट्यूट, डीआरएस आणि सीमारेषेवर घेतलेले झेल यांच्या नियमांमध्ये काही बदल केले जात आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) पुढील महिन्यापासून नवीन खेळण्याच्या अटी लागू होतील. ज्यामध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये एकच चेंडू वापरण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. ICC ने म्हटलं आहे की सुधारित अटी जूनपासून कसोटी सामन्यांमध्ये आणि जुलैपासून आंतरराष्ट्रीय पांढऱ्या चेंडूच्या खेळांमध्ये तात्काळ लागू होतील.
वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजांना फायदा
क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉलमध्ये संतुलन निर्माण करणं हे आयसीसीचे मुख्य उद्दिष्ट आहे. अलिकडच्या काळात, विशेषतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये, फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे, ज्यामुळे गोलंदाज अडचणी येत आहेत. पण आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये लागू असलेला दोन चेंडूंचा नियम रद्द करण्याची योजना आहे. या नियमानुसार, दोन्ही टोकांकडून दोन नवीन चेंडू वापरण्यात येत असत, ज्यामुळे गोलंदाजांना स्विंग आणि सीमचा जास्त फायदा करून घेता येत नसे.
जून २०२५ पासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, आता एकदिवसीय सामन्यांमध्ये ३४ षटकांपर्यंत दोन चेंडू वापरले जातील. यानंतर, ३५ ते ५० षटकांपर्यंत फक्त १ चेंडू वापरला जाईल. क्षेत्ररक्षण करणारा संघ ३५ ते ५० षटकांसाठी वापरण्यासाठी दोन चेंडूंपैकी एक निवडेल. निवडलेला चेंडू उर्वरित सामन्यासाठी दोन्ही टोकांकडून वापरला जाईल. जर पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे एकदिवसीय सामना २५ षटकांपेक्षा कमी खेळवला गेला तर दोन्ही डावांमध्ये फक्त एकच चेंडू वापरला जाईल. एकदिवसीय सामन्यांमधील हा नवीन नियम २ जुलैपासून श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेपासून लागू केला जाईल.
कनक्शन सबस्टीट्यूट नियमातही बदल होणार
कनक्शन सबस्टिट्यूटचा नियम देखील गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. पण आता संघांना सामना सुरू होण्यापूर्वी पाच कन्कशन रिप्लेसमेंट खेळाडूंची नावे मॅच रेफरीला सांगावी लागतील. या ५ खेळाडूंपैकी एक विकेटकीपर, एक फलंदाज, एक वेगवान गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू असेल.
दुसरीकडे, आयसीसी लवकरच सर्व संघांना सीमारेषेजवळ पकडले जाणारे झेल आणि डीआरएस प्रोटोकॉलच्या नियमांमधील बदलांची माहिती देईल. कसोटीतील नवीन नियम २०२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर लागू केले जातील.