क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बिस्मिल्ला जान शिनवारी यांचे वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी निधन झाले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मंगळवारी यासंबंधित माहिती दिली. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. अफगाणिस्तानचे असलेले शिनवारी काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने पाकिस्तानमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु त्यानंतर त्यांचे निधन झाले.
शिनवारी यांनी ४६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मैदानावर पंच म्हणून जबाबदारी पार पाडली होती. शिनवारी हे आयसीसी आंतरराष्ट्रीय पंच पॅनेलचे सदस्य होते आणि त्यांनी २५ एकदिवसीय आणि २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले होते. डिसेंबर २०१७ मध्ये शारजाह येथे अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यातून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये, त्यांनी या वर्षी १८ फेब्रुवारी रोजी ओमान विरुद्ध अमेरिका सामन्यात पंच म्हणून काम केले; तर टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, पंच म्हणून त्यांचा शेवटचा सामना १८ मार्च रोजी शारजाह येथे खेळला गेलेला अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड सामना होता.
बिस्मिल्ला जान शिनवारी यांच्या भावाने त्यांच्या मृत्यूबाबत माहिती देत सांगितलं की, “ते आजारी पडल्यानंतर पेशावरला गेले होते. त्यांनी सांगितलं की त्यांना अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करायची आहे. काही दिवसांकरता ते रूग्णालयात होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली पण दुर्देवाने काही दिवसांनी त्यांचं निधन झालं.”
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) मंगळवारी त्यांना श्रद्धांजली वाहत पोस्ट शेअर केली आहे, एसीबीने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं- “बिस्मिल्ला जान शिनवारी यांच्या निधनाने एसीबी आणि संपूर्ण अफगाण संघाला खूप दुःख आणि धक्का बसला आहे. ते अफगाणिस्तानच्या एलिट पंच पॅनेलचे एक आदरणीय सदस्य होते, आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. बिस्मिल्ला जान हे अफगाण क्रिकेटचे खरे सेवक होते, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि संपूर्ण अफगाण क्रिकेट समुदायाप्रति मनापासून शोक व्यक्त करतो.”
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनीही शिनवारी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि आयसीसीने पोस्टही शेअर केली आहे.