आयपीएल ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी अटक होण्याच्या आठवडाभर आधीच गुरुनाथ मयप्पनच्या सट्टेबाजीशी संबंधांबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ताकीद दिली होती. आयपीएलच्या प्रारंभीच्या दिवसांतच आयसीसीने सट्टेबाजांपासून दूर राहा, अशी ताकीद दिल्याचे पोलीस चौकशीत समोर येत आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई मयप्पनच्या सट्टेबाजांशी निगडित संशयास्पद हालचालींच्या पाश्र्वभूमीवर आयसीसीच्या लाचलुचपत विरोधी विभागाने आधीच सावध केले होते, असे या प्रकरणी तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात अटकेत असलेल्या मयप्पनने अभिनेता विंदू रंधवा यालासुद्धा ‘सावध रहा, मला ताकीद देण्यात आली आहे’, असे सांगितले होते. आयसीसीच्या लाचलुचपत विरोधी आणि सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव मात्र सूत्रांकडून समजू शकले नाही.
मयप्पनच्या संशयास्पद कृतीबाबत आयसीसीच्या अधिकाऱ्याने बीसीसीआयला सांगितले नव्हते, तर त्याने थेट मयप्पनशी संपर्क साधून ताकीद दिली होती, असे सूत्रांकडून समजते.
आयसीसीने तुला का ताकीद दिली, असे मयप्पनला विचारले असता तो म्हणाला, ‘‘कदाचीत मी ज्या मंडळींच्या सोबत असतो, त्यामुळे असेल.’’ यासंदर्भातील कोणतेही वस्तुनिष्ठ पुरावे पोलिसांकडे नाहीत.

आयसीसीने बीसीसीआयला कल्पना दिली नव्हती -शेट्टी
मुंबई : गुरुनाथ मयप्पनने सट्टेबाजांपासून दूर राहावे, अशी ताकीद आयसीसीने त्याला दिली असली तरी त्याबाबत आयसीसीने बीसीसीआयला मात्र कोणतीच कल्पना दिली नव्हती, असे बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘चेन्नई येथे १९ मे रोजी झालेल्या बीसीसीआयच्या तातडीच्या बैठकीत आयसीसीचे लाचलुचपत विरोधी आणि सुरक्षा पथकाचे प्रमुख वाय. पी. सिंग उपस्थित होते. पण त्यांनी याबाबत काहीही सांगितले नाही.’’