ICC Women’s Cricket World Cup 2025- Prize Money Increased : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस भारतात सुरू होणाऱ्या वूमन्स वनडे वर्ल्डकपच्या बक्षीस रकमेत आयसीसीने घसघशीत वाढ केली. २०२३ मध्ये भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपवेळी पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. कमिन्सच्या संघाने जेतेपदावर नाव कोरत जेवढी कमाई केली त्यापेक्षा जास्त रक्कम महिला वनडे वर्ल्डकपविजेत्या संघाला मिळणार आहे.

आयसीसीने सोमवारी वनडे वर्ल्डकपसाठी बक्षीसाची घोषणा केली. २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या तुलनेत २९७ टक्क्यांनी बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली आहे. भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी १३.८८ मिलिअन डॉलर्स इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेवेळी बक्षीस रक्कम अवघी ३.५ मिलिअन डॉलर एवढीच होती.

२०२३ मध्ये झालेल्या पुरुषांच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बक्षीस रक्कम १० मिलिअन डॉलर एवढी होती. महिलांच्या स्पर्धेसाठी आयसीसीने तिजोरी मुक्तपणे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नवी मुंबई किंवा कोलंबो इथे होणाऱ्या अंतिम लढतीच्या विजेत्या संघाला ४.४८ मिलिअन डॉलर्स बक्षीस रकमेने गौरवण्यात येणार आहे. विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला १.३२ मिलिअन डॉलर्स रकमेने सन्मानित करण्यात आलं होतं. पॅट कमिन्सच्या संघाने २०२३ मध्ये वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं. ४ मिलिअन डॉलर्स रकमेने त्यांना गौरवण्यात आलं होतं.

उपविजेत्या संघाला २.२४ मिलिअन डॉलर्स रकम मिळणार आहे. सेमी फायनलमध्ये धडक मारणाऱ्या चार संघांना प्रत्येकी १.१२ मिलिअन डॉलर्स एवढी रक्कम मिळेल.