ज्या देशात क्रिकेटला धर्माचं रुप दिलं जातं, क्रिकेटपटूंना जिथे चाहते देवासारखं पुजलं जातं, तिकडे महिला क्रिकेट हे आतापर्यंत उपेक्षित राहिलं होतं, यात कोणाचंही दुमत असता कामा नये. मिताली राजच्या टीम इंडियाने लंडन येथे सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि अचानक, चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवामुळे घायाळ झालेला भारतीय चाहता महिला क्रिकेटकडे वळला. मात्र यात चाहत्यांनाही दोषी धरता येणार नाही, कारण महिला क्रिकेटची अवस्थाच बीसीसीआयने तशी करुन ठेवली आहे. मात्र या सर्व अडचणींवर मात करुन मिताली राज आणि तिच्या संघाने आपली दखल सगळ्यांना घ्यायलाच लावली.
अंतिम फेरीत भारतीय महिला हरल्या, हातात आलेला विजय मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे हातातून निसटला. मात्र असं असलं तरीही त्यांच्या हिमतीला आणि मेहनतीला तितकीच दाद द्यावी लागेल. या स्पर्धेचे सुरुवातीचे दोन सामने आठवून पहा. मिताली राजच्या संघाने लागोपाठ सामने जिंकत स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली. त्याच सुमारास भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानकडून पराभूत होऊन वेस्ट इंडिज दौऱ्यावर आलेला होता. अशावेळी पत्रकार परिषदेत, मिताली राजला तुझा आवडता क्रिकेटपटू कोण?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मितालीनेही, हाच प्रश्न तुम्ही पुरुष संघातल्या कोणाला विचारता का? असा प्रतिप्रश्न करत सडेतोड उत्तर दिलं. सर्वात प्रथम महिला संघाचंही एक वेगळं अस्तित्व आहे, हे आपण सर्वांनी मान्य करायला पाहिजे होतं. महिला संघाने मिळवलेल्या विजयाची ही स्वतंत्र चर्चा व्हायला हवी, त्यांच्या खेळाचं मुल्यमापन हे देखील स्वतंत्रपणे व्हायला हवं. प्रत्येकवेळा महिला संघाची तुलना पुरुष संघाशी करणं चुकीच ठरेल.
मीडियाचं सातत्याने होणारं दुर्लक्ष, स्पॉन्सरर्सची कमतरता, सामन्यांचं न होणारं प्रसारण यामुळे महिला क्रिकेट मागे पडलं. मात्र याचा मिताली राज आणि तिच्या संघाने बाऊ केला नाही. समोर आलेला प्रत्येक सामना जिंकायचाच या इर्ष्येने त्या खेळल्या, आणि म्हणूनच मैदानात त्यांना जे यश-अपयश मिळालं, त्यांच्या त्या पूर्णपणे दावेदार आहेत. त्यामुळे त्यांचं यश-अपयश हे स्वतंत्र तराजुनेच तोललं गेलं पाहिजे.
पहिले ४ सामने जिंकत मिताली राजची टीम इंडिया विजय रथावर आरुढ झाली. मात्र दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या रथाचं चा जमिनीत रुतलं. अशावेळी लाखो चाहत्यांच्या अपेक्षा या ११ जणींच्या खांद्यावर होत्या. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक होतं. या सामन्यातही मिताली राजने १०९ धावांची शतकी खेळी करत, कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. पाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही भारताच्या या रणरागिणींनी सुरेख खेळ करत आपला हिसका दाखवत अंतिम फेरीत प्रवेश केला. न भूतो न भविष्यती असा खेळ केल्यामुळे अंतिम सामन्यात प्रत्येक भारतीयाला महिला संघाने विश्वचषत जिंकावा अशी मनोमन आशा होती.
आणि कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षेवर खरं उतरत भारतीय महिलांनी अंतिम सामन्यातही अगदी जिगरबाज खेळ केला. झुलन गोस्वामीने केलेल्या माऱ्यापुढे इंग्लंडच्या महिला फलंदाज ढेपाळल्या, झुलनला इतर भारतीय गोलंदाजांनीही तितकीच चांगली साथ दिली. त्यामुळे इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला कमी थावसंख्येवर रोखल्यामुळे भारत हा सामना जिंकणार हे जवळपास निश्चीत मानवं जातं होतं.
मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे हा सामना आपण गमावला, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. १९१/३ या धावसंख्येवरुन भारतीय महिला संघ २१९ धावांवर सर्वबाद झाला. असा खेळ अंतिम फेरीत येऊन करणं हे न पटण्यासारखं आहे. पुनम राऊत आणि हरमनप्रीत कौर यांच्या भागीदारीमुळे सामना जवळपास आपल्या हातात आला होता. विजयाच्या दाराची कडी उघडणं हे आपल्या हातात होतं, मात्र एखादं सुंदर स्वप्न पाहत असताना अचानक आपली झोपमोडं व्हावी असं काहीसं झालं आणि क्षणार्धात भारतीय संघ बाद झाला. त्यामुळे एकाप्रकारे आपणच आपल्या पायावर धोंडा मारुन घेतल्यासारखं वाटायला लागलं.
मात्र कितीही झालं, तरीही क्रिकेट हा खेळ आहे. कठीण परिस्थितीत, आपल्यापेक्षा बलाढ्य संघाना पराभवाची धूळ चारत भारतीय महिला अंतिम फेरीत येऊन धडकल्या. भारताच्या छोट्या शहरांमधून आलेल्या मुलींना या स्पर्धेने आपली ओळख दिली आहे. हरमनप्रीत कौर, मुलीच्या क्रिकेटसाठी चहावाला बनणारे एकता बिश्तचे बाबा, वडिलांचं छत्र हरपुनही आपल्या परिवाराला सांभाळणारी कर्नाटकची राजेश्वरी गायकवाड या गेल्या काही दिवसात भारताला मिळालेलं लाखमोलाचं धन आहेत.
ज्या संघावर चाहते प्रेम करतात, तो हरल्यानंतर त्यांना दु:ख होणं साहजिकच आहे. मात्र खेळात हार-जीत होतचं असते. त्यामुळे आगामी काळात महिला क्रिकेटला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल, त्यांचे सामने जास्तीत जास्त बघितले जावेत यासाठी प्रयत्न करणं ही प्रेक्षक म्हणून आपली ही जबाबदारी आहे. भारतीय क्रिकेटच्या सर्व मुली या एका अर्थाने आज हिरो आहेत. अंतिम फेरीत केलेल्या हाराकिरीचं दु:ख एक चाहता म्हणून आपल्या सर्वांना काही दिवस राहिलचं. मात्र इतके दिवसं ज्या खेळाडू आपल्या खिजगणतीतही नव्हत्या, त्यांनी आपल्याला खेळाबद्दल पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं यात काही शंकाच नाही.
त्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय महिला हरल्या असल्या तरीही त्या कोट्यवधी भारतीयांचं मन जिंकून हरल्या आहेत असंच म्हणावं लागेल.