३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने महिनाभरापूर्वी भारतीय संघाची घोषणा केली. संघात महेंद्रसिंह धोनीला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोघांची नाव चर्चेत होती. आयपीएलआधी झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधली कामगिरी पाहता पंत विश्वचषक संघात स्थान पक्क करेल असा अंदाज सर्वांनी बांधला होता. मात्र एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर निवड समितीच्या निर्णयावर चाहते आणि अनेक माजी खेळाडूंनी टीकाही केली. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केवळ अनुभवाच्या जोरावर पंतऐवजी कार्तिकला संघात स्थान मिळाल्याचं स्पष्ट केलंय.

“खडतर परिस्थितीमध्ये कसा खेळ करावा याची दिनेशला चांगली माहिती आहे. त्यामुळे बैठकीदरम्यान सर्व जण दिनेशच्या निवडीबद्दल ठाम होते. त्याच्याकडे अनुभव आहे. जर दुर्दैवाने धोनीला दुखापत झाली तर दिनेश यष्टीरक्षणासोबत अखेरच्या फळीत फटकेबाजीचं कामही करु शकतो. त्यामुळे विश्वचषक संघात निवड करताना त्याचा अनुभव आणि इतर सर्व बाबींचा विचार केला गेला.” टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली बोलत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या दिनेश कार्तिकने आतापर्यंत ९१ वन-डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. याउलट पंतकडे केवळ ५ वन-डे सामन्यांचा अनुभव आहे. ३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार असून ५ जूनरोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.