आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेतील आपली स्वप्नवत घोडदौड कायम राखताना भारताने रविवारी बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा ७३ धावांनी पराभव केला आणि समस्त भारतवासीयांना गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला विजयाची भेट दिली. दुसऱ्या गटातून उपांत्य फेरीत आधीच स्थान निश्चित करणाऱ्या भारताने अव्वल-१० फेरीमध्ये चारपैकी चार लढती जिंकण्याची किमया साधली.
कप्तान महेंद्रसिंग धोनीचा विश्वास सार्थ ठरवत युवराज सिंगने धडाकेबाज ६० धावांची खेळी साकारली. धिम्या खेळपट्टीवर आक्रमक फलंदाजी करीत युवीने ४३ चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकारांसह उभारलेल्या खेळीमुळे भारताला ७ बाद १५९ अशी धावसंख्या उभारता आली. मग भारताच्या फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला १६.२ षटकांत फक्त ८६ धावांत गुंडाळले. अमित मिश्राप्रमाणेच रविचंद्रन अश्विनने सलग दुसऱ्या सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकत या अभियानात सिंहाचा वाटा उचलला. ३.२-०-११-४ असे त्याच्या गोलंदाजीचे प्रभावी पृथक्करण होते. मिश्राने १३ धावांत २ बळी घेत त्याला सुरेख साथ दिली. २००७नंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकाची प्रथमच उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताने या प्रकारातील हा संस्मरणीय विजय नोंदवला.
फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रांतांमध्ये भारताची कामगिरी ऑस्ट्रेलियापेक्षा सरस झाली. डेव्हिड वॉर्नर (१९), ग्लेन मॅक्सवेल (२३) वगळता ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर दीर्घकाळ टिकाव धरता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ७ बाद १५९ (युवराज सिंग ६०, महेंद्रसिंग धोनी २४; ब्रॅड हॉज १/१३) विजयी वि. ऑस्ट्रेलिया : १६.२ षटकांत सर्व बाद ८६ (ग्लेन मॅक्सवेल २३, डेव्हिड वॉर्नर १९; आर. अश्विन ४/१९, अमित मिश्रा २/१३)
सामनावीर : आर. अश्विन.
आर. अश्विन:  ३.२-०-११-४
आजचे सामने  ’ पुरुष  ’   ल्ल   इंग्लंड वि. नेदरलँड्स- दुपारी ३ वा. – चित्तगांव  ल्ल   न्यूझीलंड वि. श्रीलंका – सायं. ७ वा. – चित्तगांव  ’ महिला  ’ ल्ल  आर्यलड वि. पाकिस्तान – दुपारी ३ वा. – सिल्हेट   ल्ल  न्यूझीलंड वि. द.आफ्रिका- रात्री ७ वा.- सिल्हेट ल्ल   थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर