आइसलँड क्रिकेटने अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मिळालेल्या फॉलोअर्समध्ये अचानक वाढ झाल्याबद्दल खूप प्रेम दाखवले, ज्यापैकी बहुतांश फॉलोअर्स भारतीय चाहत्यांकडून आले. दोन्ही बाजूंनी एकत्रित केलेले संभाषण खूपच हृदयस्पर्शी आहे. भारतात क्रिकेट हा खेळ खूपच प्रसिद्ध आहे त्यामुळे आइसलँड क्रिकेटही त्याच प्रकारे पुढे जावे, प्रगती व्हावी म्हणून सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी दिलेला पाठींबा खूप मोलाचा आहे, असे म्हणत आइसलँड क्रिकेटने आभार मानले आहेत.

जेव्हा क्रिकेटच्या खेळाचा विचार केला जातो तेव्हा एखाद्याला हे मान्य करावे लागेल की हा एक खेळ आहे जो जगभरात लोकप्रियता वाढवत आहे. आकडेवारीनुसार सांगायचे तर ते फुटबॉलइतके प्रसिद्ध नसेल; पण आपण जर विचार केला तर अलीकडेच दिवसेंदिवस अधिकाधिक देश त्यांच्या स्वत: च्या क्रिकेट संघ तयार करून क्रिकेट या खेळत सहभागी होऊ इच्छित आहेत याला क्रिकेटबद्दल असणारे प्रेमच आपण म्हटले पाहिजे.

“ज्याप्रमाणे बीसीसीआय भारतातील क्रिकेटशी संबंधित प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार असून योग्य त्या सोयीसुविधा पुरवत आहे खेळाडूंची काळजी घेत आहे, त्याचप्रमाणे आइसलँड क्रिकेट आईसलँडमधील क्रिकेट खेळासंबधी सर्वप्रकारची काळजी घेते. आइसलँड क्रिकेट जरी ते अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा अधिकृत सदस्य नसला तरी ते २०२४-२५ पर्यंत सदस्य होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत.” असे मत आइसलँड क्रिकेट बोर्डाने मांडले.

आइसलँडने २००८ मध्ये पहिल्यांदा त्यांचा राष्ट्रीय क्रिकेट संघ तयार केला. प्रागमध्ये आयोजित केलेल्या २०१६ पेप्सी चषकात त्यांनी सहभागही घेतला होता. त्या पेप्सी चषकात जरी ते सहा प्रतिस्पर्धी संघांपैकी पाचव्या स्थानावर असले तरी त्यांचे खेळावरील प्रेम अधिकच वाढले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये आइसलँड क्रिकेटने जर काही कमवले असेल तर ते म्हणजे चाहत्यांचे प्रेम आणि खेळाबद्दलची आपुलकी. क्रिकेटच्या नकाशावर आधीच प्रसिद्ध नसलेला मात्र स्वत:ला ठळकपणे सिद्ध करण्याची क्षमता असलेला एक छोटा संघ असूनही, त्यांच्या क्रिकेट मंडळाने सोशल मीडियावर उपस्थिती नोंदवत जगभरातील चाहत्यांची मने जिंकण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत, कोणत्याही देशातील खेळाच्या वाढीशी भावनिकरित्या जोडलेले असणे हे खूप महत्वाचे आहे.

आइसलँड क्रिकेटने नुकतेच क्रिकेट जगताला विनंती केली होती की,” राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या ट्विटर हॅण्डलला जेवढे फॉलोअर्सला आहेत त्यापेक्षा अधिक फॉलोअर्स क्रिकेटच्या ट्विटर हॅण्डलला झाले पाहिजेत. यासाठी आम्हाला अजून ३००० पेक्षा जास्त फॉलोअर्सची गरज असून ती मिळविण्यात चाहत्यांनी मदत करावी. अशी साद त्यांनी घातली होती आणि काही दिवसांतच, त्यांना ११,००० हून अधिक फॉलोअर्स मिळाले, जे की  कमी होण्याची चिन्हे नाहीत. या प्रेक्षकांच्या प्रतिसादाने भारावून टाकले असून त्यांना मिळालेल्या प्रेमाबद्दल आइसलँड क्रिकेटने आभार मानले आहेत. त्यातही भारतीय चाहत्यांचे खासकरून आभार मानले आहेत.