भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपली निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला. ख्रिस वोक्सने त्याला पायचित करत बाद केले. भारताच्या उपकर्णधाराने कसोटी मालिकेत सातत्याने धावा काढण्यासाठी संघर्ष केला आहे आणि ओव्हलमध्ये दोन डावांमध्ये केवळ १४ धावा करू शकला. अनेक तज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंनी रहाणेच्या खेळीवरुन प्लेईंग ११मध्ये त्याच्या जागेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

अजिंक्य रहाणेच्या खेळीबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि लोकप्रिय समालोचक संजय मांजरेकर यांनी आता भाष्य केलं आहे. रहाणे जर इंग्लडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला तर तो खूप भाग्यवान असेल असे संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे. रहाणेला भरपूर संधी मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी मांजरेकरांनी राहुल द्रविडचे उदाहरण दिले जेव्हा मांजरेकरांच्या जागी द्रविडला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.

स्वतःचे उदाहरण देत मांजरेकर यांनी रहाणेला वगळणे हा भारतासाठी योग्य निर्णय का असेल हे स्पष्ट केले आहे. जेव्हा त्यांना संघातून वगळण्यात आले होते तेव्हा राहुल द्रविड आणि इतरांना प्लेईंग ११मध्ये संधी कशी मिळाली हे मांजरेकर यांनी सांगितले. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर बोलताना संजय मांजरेकर यांनी अजिंक्य रहाणेच्या फॉर्मवर प्रतिक्रिया दिली. स्वत:चे उदाहरण देत ते म्हणाले, “बेंचवर बसलेल्या खेळाडूंबद्दल तुमच्याकडे वेगळ्या प्रकारचे विचार आहेत. भारतीय क्रिकेटकडे तुम्ही असेच पाहता. कल्पना करा जर मला वगळले नसते तर राहुल द्रविडसह सर्व महान खेळाडू संघात आले नसते.”

संजय मांजरेकर यांच्या मते, रहाणेच्या जागी हनुमा विहारी किंवा सूर्यकुमार यादव यांना संघात संधी मिळायला हवी. ते पुढे म्हणाले, “आधी हनुमा विहारी आणि नंतर कदाचित सूर्यकुमार यादवला संधी मिळेल. राखीव खेळाडू बेंचवर बसले आहेत त्यामुळे तुम्हाला त्यांच्या खेळाबद्दल एवढे माहिती नाही. दुसरीकडे, अजिंक्य रहाणे सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही.”

रहाणे विश्व कसोटी अजिंक्यपद २०१९-२१ मध्ये १८ सामन्यांत ११५९ धावांसह भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत, भरपूर संधी मिळूनही तो त्याच्या सर्वोत्तम खेळापासून दूरच आहे. रहाणेने आतापर्यंत चारही कसोटींमध्ये त्याला फक्त १०९ धावा काढता आल्या आल्या आहेत.