बिकट परिस्थितीवर मात करीत सिद्धेशचा बॅडमिंटनमध्ये ठसा

सिद्धेशने २०१६ मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरी गटात विजेतेपद पटकावले.

Siddhesh Raut
सिद्धेश राऊत

आयुष्य कधी कोणते वळण घेईल, हे कुणालाही सांगता येणे कठीण आहे. फक्त खेळाची मजा लुटायची, या हेतूने वडिलांसोबत बॅडमिंटन खेळायला सुरुवात करणाऱ्या सिद्धेश राऊतला आपली कारकीर्द याच खेळात घडणार आहे, याची पुसटशी कल्पनाही त्यावेळी नव्हती. मात्र घरच्या परिस्थितीवर मात करून सिद्धेशने आता बॅडमिंटनमध्ये आपला ठसा उमटवला आहे. आता अर्थार्जनाच्या दृष्टीने तो उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शनही करतो. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे सुरू असलेल्या जिल्हा अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेत आपल्या कामगिरीसह सिद्धेश सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.

वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी सिद्धेशमधील बॅडमिंटनची आवड व खेळण्याची कला त्याच्या वडिलांनी हेरली. प्रभादेवीतील एका चाळीत १० बाय १०च्या खोलीत राहणाऱ्या सिद्धेशचे वडील प्रभादेवी येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रात कारकून म्हणून कार्यरत आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे नेहमीच आपल्या आवडींना आवर घालणाऱ्या वडिलांनी आपल्या मुलाचे बॅडमिंटनमधील कौशल्य जाणून त्याला सचिन भारती यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवले. त्यांनी सिद्धेशला सात वर्षे प्रशिक्षण दिले. वाहतुकीच्या खर्चापासून ते बॅडमिंटनची रॅकेट, बूट, शटलकॉक अशा अनेक गोष्टी भारती यांनी सिद्धेशला उपलब्ध केल्या. १७ वर्षीय सिद्धेश सध्या माटुंगा जिमखान्यात प्रशिक्षणाची जबाबदारीही पार पाडत आहे.

१९ वर्षांखालील जिल्हा, राज्य व राष्टीय अशा तिन्ही स्तरांवर खेळणाऱ्या सिद्धेशने २०१६ मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरी गटात विजेतेपद पटकावले. याव्यतिरिक्त दोन राज्यस्तरीय स्पर्धामध्येसुद्धा त्याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. गेल्या आठवडय़ात सीसीआय येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद स्पध्रेत सिद्धेशने द्वितीय मानांकित सिद्धेश आरोसकरचा पराभव केला. भारती यांना आदर्श मानणाऱ्या सिद्धेशचा बॅडमिंटनमधील आवडता खेळाडू मलेशियाचा लि च्याँग वुई आहे.

‘‘माझी तंदुरुस्ती दिवसेंदिवस सुधारत असून दररोज चार ते पाच तास मी व्यायाम व सरावावर भर देतो. बॅडमिंटन हा एका जागी उभा राहून खेळता येणारा खेळ नाही. त्यासाठी तुम्हाला शरीराच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग करावा लागतो. म्हणूनच तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. माझ्या सध्याच्या तंदुरुस्तीला मी स्वत: १० पैकी फक्त ४ गुण देईन,’’ असे शारीरिक क्षमतेविषयी सिद्धेशने सांगितले.

बॅडमिंटन क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी सिद्धेश दिवस-रात्र धडपडत आहे. बॅडमिंटनला मुलींचा खेळ म्हणून ओळखणाऱ्या चाहत्यांना सिद्धेशने सरळ उत्तर दिले की, हे साफ चुकीचे आहे. तो पुढे म्हणाला, ‘‘मुलींप्रमाणेच मुलेही तितक्याच तोडीने बॅडमिंटन हा खेळ खेळतात. जगातील सर्वात जलद खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅडमिंटनमध्ये आपले नावही नामांकित खेळाडूंच्या यादीत यावे, यासाठी माझी मेहनत सुरू आहे.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: In difficult circumstances siddhesh raut create impression in badminton