परदेशी खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करुन गोलंदाजांना साथ देणं गरजेचं असल्याचं मत, भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने केलं आहे. तिसऱ्या कसोटीआधी तो पत्रकारांशी बोलत होता. या वर्षी भारतीय संघाला आपल्या परदेश दौऱ्यात बेभरवशाच्या फलंदाजीने दगा दिला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळे, गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीवर पाणी फिरलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये काही ठराविक फलंदाजांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. याच कारणासाठी भारताने तिसऱ्या कसोटीत मुरली विजय आणि लोकेश राहुल या सलामीवीरांना डच्चू देत नवोदीत मयांक अग्रवालला संघात स्थान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – IND vs AUS : तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, मयांक अग्रवालला संघात स्थान

“फलंदाजांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची नितांत गरज आहे. परदेशी खेळपट्ट्यांवर जेव्हा आपण फलंदाजीविषयी बोलत असतो तेव्हा ही गोष्ट महत्वाची आहे. गोलंदाज प्रत्येकवेळी 20 बळी घेऊन आपल काम चोखं बजावत आहेत, मग फलंदाजांची त्यांना योग्य साथ मिळाली तर सामन्याचे निकाल हे भारताच्या बाजूनेही लागू शकतात.” अजिंक्य रहाणेने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन अर्धशतकी खेळींच्या जोरावर 164 धावा जमवल्या आहेत. मात्र आपल्या खेळीचं शतकात रुपांतर करण्यात तो अपयशी ठरलाय.

अवश्य वाचा – IND vs AUS : संघाचं हित महत्वाचं, विक्रम नंतर करता येतात – अजिंक्य रहाणे

पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मी परिस्थितीनुरुप फलंदाजी केली आहे. यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात माझ्या खेळात तुम्हाला आत्मविश्वास दिसेल. इतकच नव्हे तर तिसऱ्या कसोटी सामन्यात मी कदाचीत शतक किंवा द्विशतकही झळकावू शकतो असं अजिंक्य रहाणेने म्हटलंय. 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना सुरु होत आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत सध्या भारत 1-1 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात बाजी मारुन मालिकेत आघाडी कोण घेतं याकडे सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागलेल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus indias batsmen must help bowlers says vice captain ajinkya rahane
First published on: 25-12-2018 at 08:39 IST