mohammed siraj litton das: बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेमध्ये आज यजमान संघाला फॉलोऑन देऊन पुन्हा फलंदाजीसाठी आमंत्रित करण्याचं भारतीय संघाचं उद्दीष्ट असेल. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव (३३ धावांत ४ बळी) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (१४ धावांत ३ बळी) यांच्या प्रभावी माऱ्यामुळे भारताने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दुसऱ्या दिवसअखेर बांगलादेशची ८ बाद १३३ धावा अशी स्थिती असून भारताच्या धावसंख्येच्या ते २७१ धावांनी पिछाडीवर आहेत. फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना आणखी ७२ धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी सर्वाधिक चर्चेत राहिलेली विकेट ठरली ती लिटन दासची.

भारताने पहिल्या डावात ४०४ धावांची मजल मारल्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजीची सुरुवात अडखळत झाली. मोहम्मद सिराजने नजमुल हसन शंटो (०) आणि उमेश यादवने यासिर अलीला (४) बाद करत बांगलादेशची अवस्था २ बाद ५ अशी केली. लिटन दास (२४) आणि झाकिर हुसैन (२०) यांनी बांगलादेशच्या धावसंख्येत भर घातली. मात्र, या दोघांना सिराजने बाद केले.

यापैकी दासची विकेट लक्षात राहण्याचं कारण म्हणजे तो बाद होण्याच्या आधीच्या चेंडूवर घडलेला प्रकार. २९ चेंडूंमध्ये २४ धावांवर दास खेळत होता. कसोटी क्रिकेटचा विचार करता ही फारच वेगवान खेळी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. या छोट्या खेळीत पाच चौकार दासने लगावले. दासने १४ व्या षटकाच्या पहिला चेंडू खेळून काढला. त्यावेळी गोलंदाजी करणाऱ्या सिराजने फॉलोअपमध्ये पिचवर थोडं पुढेपर्यंत जात दासला उद्देशून काहीतरी म्हटलं. त्यानंतर दासनेही पुढे येत कानावजळ हात नेऊन ऐकू आलं नाही, थोडं मोठ्याने बोल असा इशारा केला. सिराज त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता पुन्हा बॉलिंग एण्डकडे चालू लागला.

पुढच्याच चेंडूवर म्हणजेच १४ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बॅटची कड घेऊन चेंडू दासच्या यष्ट्यांना जाऊन आदळला. त्यानंतर सिराजने दासप्रमाणेच कानाजवळ हात नेऊन काय म्हणत होतास, आता आवाज कुठे गेला अशा अर्थाने प्रश्नार्थक चेहरा करत दासला निरोप दिला. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराटनेही कानाजवळ हात नेत आवाज गायब झाल्याची सांकेतिक खूण केली. मात्र दास बाद होण्याच्या आधीच्या चेंडूवर सिराज नेमकं त्याला काय म्हणाला होता? हा विषय चर्चेत असताना आता सिराजनेच यावर उत्तर दिलं आहे.

कालचा सामना संपल्यानंतर सिराजला तू नेमका काय म्हणाला होता असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सिराजने, “मी लिटनला केवळ एवढं सांगितलं की थोडं डोकं लावून खेळ कारण हा काही टी-२० सामना नाही,” असं विधान केल्याचं सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिराज आणि लिटनमधील या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.