बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत धडाकेबाज सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात आपला पहिला दिवस-रात्र सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्याच सत्रात बांगलादेशी फलंदाजांची दाणादाण उडवली. गुलाबी चेंडू आणि इडन गार्डन्सची गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांची अक्षरशः भंबेरी उडाली.

अवघ्या २६ धावांत बांगलादेशचे पहिले ४ फलंदाज माघारी परतले होते. उमेश यादवच्या गोलंदाजीवर बांगलादेशी कर्णधार मोमिनुल हक झेलबाद झाला. रोहित शर्माने यावेळी स्लिपमध्ये हकचा सुरेख झेल टिपत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रोहितच्या या अफलातून कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बांगलादेशच्या आघाडीच्या फळीतले ३ फलंदाज हे भोपळाही न फोडता माघारी परतले. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रावर आपलं वर्चस्व गाजवत बांगलादेशला बॅकफूटवर ढकललं.