India vs England 1st Test, Jasprit Bumrah: इंग्लंडमध्ये फलंदाज चमकणार की गोलंदाज, हे हवामानावर अवलंबून असतं. पहिल्या दिवशी ऊन पडल्याने भारतीय फलंदाजांना चांगलाच फायदा झाला. याचा फायदा घेत भारताच्या ३ फलंदाजांनी शतकं झळकावली संघाची धावसंख्या ४५० पार पोहोचवली. मात्र पावसाने हजेरी लावल्याने भारताचा संपूर्ण डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच मोठा धक्का दिला.
भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४७१ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. सलामीवीर फलंदाज जॅक क्रॉली शून्यावर माघारी परतला. इंग्लंडला ४ धावसंख्येवर पहिला धक्का बसला.
तर झाले असे की, इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेटची जोडी मैदानावर आली. या जोडीकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. मात्र, समोर अनुभवी जसप्रीत बुमराह होता. गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या वातावरणात बुमराहचे चेंडू हवेत स्विंग होत होते. त्यामुळे जॅक क्रॉलीला बुमराहचा सामना करणं जड जात होतं.
या षटकातील शेवटचा चेंडू बुमराहने मिडल आणि ऑफ स्टंपवर गुड लेंथवर टाकला. हा चेंडू टप्पा पडताच आत आला आणि जॅक क्रॉलीला काही कळायच्या आत बॅटची कडा घेऊन पहिल्या स्लिपमध्ये गेला. पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या करुण नायरने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला.
भारतीय संघाने केल्या ४७१ धावा
या सामन्यातील पहिल्या इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजीला आलेल्या सलामीवीर यशस्वी जैस्वालने १०१ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ४२ धावांची खेळी केली. कर्णधार शुबमन गिलने १४७ आणि उपकर्णधार ऋषभ पंतने १३४ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडे ५०० धावांचा डोंगर उभारण्याची संधी होती. मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी अवघ्या ४१ धावांत ७ विकेट्स गमावल्या. गिल बाद झाल्यानंतर करुण नायर ०, ऋषभ पंत १३४, रविंद्र जडेजा ११, शार्दुल ठाकूर १, जसप्रीत बुमराह ० आणि प्रसिद्ध कृष्णा १ धाव करत माघारी परतला. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४७१ धावांचा डोंगर उभारला.