IND vs ENG 2nd Test: भारत वि. इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा निम्मा संघ तंबूत परतला असला तरी टीम इंडिया मजबूत स्थितीत दिसत आहे. कर्णधार शुबमन गिलचं शतक, जडेजाचं अर्धशतक या खेळींच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवशी ३७५ अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. पण या दरम्यान एजबेस्टनमधील बाऊंड्री लाईन मोठा चर्चेचा विषय आहेत. संघाच्या माजी खेळाडूनेच त्यांची पोलखोल केली आहे.

एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या दिवशी जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा सीमारेषेबाबत चर्चा सुरू झाली, कारण सीमारेषा असमान दिसत होती. क्रिकेट बारकाईने पाहणारे असंही म्हणत आहेत की त्यांनी या मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये इतकी छोटी बाऊंड्री लाईन पाहिलेली नाही. यावरून आता इंग्लिश संघ टीम इंडियाविरूद्ध कट रचला आहे का अशी चर्चा सुरू आहे.

सर्वात लांब सीमारेषा ६५ मीटर होती, जी काऊ-कॉर्नरच्या दिशेने होती, तर सरळ सीमारेषा सुमारे ६० मीटर लांब होती. विशेष म्हणजे, भारतीय संघाने आधीच दोन फिरकी गोलंदाज खेळवण्याची घोषणा केली होती, त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो की ही छोटी सीमारेषा याच कारणासाठी अशी ठेवण्यात आली आहे का? जेणेकरून इंग्लंडचे फलंदाज मोठे फटके खेळू शकतील.

इंग्लंडची फलंदाजी फिरकी गोलंदाजांविरुद्ध कमकुवत मानली जाते. भारतीय संघाने जाहीरपणे असंही म्हटले आहे की फिरकी गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजी लाइनअपला रोखू शकतात. एजबॅस्टन कसोटीत भारताने कुलदीप यादवऐवजी वॉशिंग्टन सुंदरची निवड केली कारण तो मोठ्या स्पेल टाकू शकतो. तसेच, खालच्या फळीत त्यांची फलंदाजीही महत्त्वपूर्ण ठरेल. लहान सीमारेषांमुळे इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठ्या खेळी खेळण्यास निश्चितच मदत करणारं ठरेल.

इंग्लंडचा माजी खेळाडू छोट्या सीमारेषेविषयी काय म्हणाला?

इंग्लंडचा माजी खेळाडू स्टीवन फिन म्हणाला, ‘आम्ही एजबॅस्टनमध्ये होतो. मी सीमारेषेजवळ उभा होतो. साधारण एखाद्या कसोटी सामन्यापेक्षा ही सीमारेषा खूप लहान दिसत होती. इंग्लंड संघाला नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायचा आहे आणि शेवटच्या डावात त्यांना मिळणाऱ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. म्हणूनच सीमारेषा इतकी लहान करण्यात आली आहे.’ फिनच्या या विधानाने चर्चांना अधिक उधाण आलं आहे.

२०१९च्या वर्ल्डकपमध्येही बदलला होता सीमारेषेचा आकार

२०१९ च्या विश्वचषकादरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एका बाजूची सीमारेषा असामान्यपणे छोटी करण्यात आल्याने भारतीय संघ नाराज होता आणि त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताचे फॉर्ममध्ये असलेले फिरकीपटू कुलदीप आणि युजवेंद्र चहल यांच्याविरूद्ध चांगली फलंदाजी केली होती.

आयसीसीच्या नियमानुसार सीमारेषेचं अंतर किती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयसीसीच्या नियमांनुसार, सीमारेषा ५९ मीटर ते ९० मीटरपर्यंत अंतराची असू शकते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, असं म्हटलं जातंय की सीमारेषेचा काही भाग किमान ५-१० मीटरने वाढवला गेला होता. दोरी आणि जाहिरात फलकांमध्ये किमान नऊ फूट अंतर असायला हवे होते, परंतु एका बाजूला बोर्डपासूनचे अंतर २०-२५ फूट असल्याचे दिसून आले.