India vs England 5th Test: इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने दिलेल्या ३७४ धावांचा पाठलाग करताना त्याने दमदार शतकी खेळी केली. या डावात फलंदाजी करताना त्याने १५२ चेंडूंचा सामना करत १२ चौकारांच्या साहाय्याने १०५ धावांची खेळी केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३९ वे शतक ठरले आहे. तर मायदेशात फलंदाजी करताना हे त्याचे २४ वे शतक ठरले आहे. यादरम्यान त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
हे शतक जो रूटसाठी अतिशय खास ठरलं आहे. कारण या शतकी खेळीसह त्याने मायदेशात फलंदाजी करताना सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने या विक्रमात महेला जयवर्धने, रिकी पाँटींग आणि जॅक कॅलिस यांना मागे टाकलं आहे. या तिघांनी मायदेशात फलंदाजी करताना प्रत्येकी २३ शतकं झळकावली आहेत. आता जो रूट एक पाऊल पुढे निघाला आहे. जो रूटने २४ शतकांचा पल्ला गाठला आहे. यासह तो मायदेशात खेळताना सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे. या शतकासह त्याने ३ दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे.
यासह रूटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुमार संगकाराला मागे टाकलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत कुमार संगकारा पाचव्या स्थानी पोहोचला आहे. कुमार संगकाराच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ३८ शतकं झळकावण्याची नोंद आहे. आता रूटच्या नावे ३९ शतकं झळकावण्याची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनने ५१ शतकं झळकावली आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या जॅक कॅलिसने ४५ आणि रिकी पाँटींगने ४१ शतकं झळकावली आहेत.
इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची गरज
भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी दमदार अर्धशतकी भागीदारी केली. जॅक क्रॉलीने १४ आणि बेन डकेटने ५४ धावांची खेळी केली. तर ओली पोपने २७ धावांची खेळी केली. जो रूटने १०५ धावा केल्या. तर हॅरी ब्रुकने १११ धावांची खेळी केली. इंग्लंडने चौथ्या दिवसाअखेर ६ गडी बाद ३३९ धावा केल्या आहेत. पाचव्या दिवशी फलंदाजी करताना भारतीय संघाला ४ गडी बाद करायचे आहेत. तर इंग्लंडला विजयासाठी आणखी ३५ धावांची गरज आहे.