Did Umpire Really Help England Team: ओव्हलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा निकाल मालिका विजयासाठी महत्त्वाचा असणार आहे. सलग पाचही कसोटी सामन्यांची नाणेफेक जिंकणाऱ्या इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर फलंदाजी करत असलेल्या भारताची सुरूवात चांगली झाली नाही. पण या सामन्यात पंचांनीच इंग्लंडला मदत करत भारतावर अन्याय केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पहिल्या सत्रातच, टीम इंडियाने त्यांचे दोन्ही सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांचे बळी गमावले आहेत. साई सुदर्शन आणि शुबमन गिल संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. इंग्लिश वेगवान गोलंदाज भेदक गोलंदाजी करत आहेत. तर यादरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर भारतीय चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

ओव्हल कसोटीत पंचचं इंग्लंडला करतायत मदत?

भारतीय डावाच्या १३ व्या षटकात ही घटना घडली. जोश टंगचा इनस्विंगर चेंडू थेट साई सुदर्शनच्या पायावर लागला. चेंडू इतका जोरदार होता की सुदर्शनचा पूर्णपणे तोल गेला आणि तो मैदानावर खाली पडला. टंगसह संपूर्ण संघाने जोरदार अपील केलं, परंतु पंचांनी सुदर्शनला नाबाद दिलं. पंच कुमार धर्मसेना हा निर्णय देत असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चाहत्यांच्या मते, या फोटोमध्ये धर्मसेना इंग्लंडच्या खेळाडूं मदत करत आहेत. चाहते म्हणत आहेत की चेंडू सुदर्शनच्या पॅडला लागला नाही तर त्याच्या बॅटला लागला असल्याचे इशारा करत पंच त्यांना सांगत आहेत. चाहत्यांचे म्हणणं आहे की धर्मसेनामुळेच इंग्लिश संघ डीआरएसपासून वाचला. जर संघाने रिव्ह्यू घेतला असता तर निर्णय भारताच्या बाजूने लागला असता आणि त्यांचा रिव्ह्यू वाया गेला असता.

पंच कुमार धर्मसेना यांचं नेमकं काय चुकलं?

पंच कुमार धर्मसेना हे श्रीलंकेचे पंच आहेत. डीआरएस आल्यापासून, जर फलंदाज पायचीत झाल्याचं अपील असेल तर पंचांनी इनसाइड एजचा इशारा करू नये. आयसीसीच्या नियमांनुसार, अपील का फेटाळण्यात आलं हे स्पष्ट करण्यापूर्वी किंवा हावभाव करण्यापूर्वी पंचांनी १५ सेकंदांच्या डीआरएस टाइमरपर्यंत वाट पाहायची असते.

या प्रकरणात पंच कुमार धर्मसेना यांनी टायमर सुरू असतानाच बोटांनी इशारा केला, ज्यामुळे इंग्लंड संघाला संभाव्य रिव्ह्यूबद्दल विचार न करता मदत झाली. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना, भारताने लंचब्रेकपर्यंत २ बाद ७२ धावा केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.