भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी सामन्यात भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत यजमान संघाला विजयापासू रोखलं. इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना ६६९ धावांची शानदार खेळी केली आणि ३११ धावांची आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात मात्र फारच खराब झाली. पण नंतर गिल आणि राहुलने भारताचा डाव सावरत मोठी भागीदारी रचली. पण यादरम्यान इंग्लंडच्या खेळाडूने बॉलबरोबर छेडछाड केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
भारताने खातंही न उघडता २ विकेट्स गमावले होते. पण यानंतर शुबमन गिल आणि केएल राहुल यांनी कमालीची फलंदाजी करत चौथ्या दिवशी शतकी भागीदारी केली. मँचेस्टर कसोटीदरम्यान इंग्लंडचा गोलंदाज ब्रायडन कार्सचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो चेंडूशी छेडछाड करताना दिसत आहे.
ब्रायडन कार्सचा तो व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनेही कॉमेंट्री करताना दाखवला होता. प्रश्न असा आहे की मँचेस्टर कसोटीत ब्रायडन कार्सने चेंडूशी छेडछाड कधी केली? तर ही संपूर्ण घटना कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी घडली. भारताच्या दुसऱ्या डावातील १२ व्या षटकात शुबमन गिलने ब्रायडन कार्सला सलग चौकार लगावले, त्यानंतर कार्स चेंडूशी छेडछाड करताना दिसला.
ब्रायडन कार्सने चेंडूबरोबर नेमकं काय केलं?
ब्रायडन कार्सने त्याच्या फॉलो-थ्रूमध्ये शूजने चेंडू थांबवला. हे वाईट नव्हतं कारण गोलंदाज सहसा असं करतात. पण, कार्सने जाणूनबुजून चेंडूची शाईन असलेल्या चमकदार भाग पायाखाली दाबला. साधारणपणे खेळाडू नेहमी चेंडू ज्यापद्धतीने अडवतात तसा चेंडू त्याने अडवला नव्हता. याउलट त्याने शूजच्या खालच्या खिळ्यांनी चेंडू दाबत घासण्याचा प्रयत्न केला. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
रिकी पॉन्टिंगने ब्रायडन कार्सची ही कृती पाहिली. त्याला आढळलं की कार्स त्याच्या बुटाने चेंडूचा एक भाग घासून तो खराब करण्याचा प्रयत्न करत होता जेणेकरून रिव्हर्स स्विंग करता येईल. स्काय स्पोर्ट्स क्रिकेटवर लाईव्ह कमेंट्री करताना पॉन्टिंग म्हणाला की, ब्रायडन कार्सचा ते अखेरचं षटक होतं, जिथे तो त्याच्या फॉलो-थ्रूमध्ये पायाने चेंडू थांबवतो आणि… अरेरे! चेंडूच्या चमकदार बाजूला शूजच्या खालील नेल्सने (खिळे) निशाण बनवत आहे.