ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मोहम्मद शमीने सर्वांची वाहवा मिळवली आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताचे आठ फलंदाज तंबूत परतले असताना मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी लंचपर्यंत इंग्लंडला थकवले. या दोघांनी नाबाद ७७ धावांची भागीदारी करत भारताला २५९ धावांची आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. दरम्यान शमीने आपले कसोटीतील दुसरे अर्धशतक साजरे केले.

चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाने दुसऱ्या डावात ६ गडी गमावून १८१ धावा केल्या. त्यानंतर भारताने पाचव्या दिवशी सकाळी ऋषभ पंतला (२२) गमावले. वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने त्याला बाद केले. भारताचा डाव लवकर आटोपणार असे सर्वांना वाटत होते, पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी उभे राहिले. त्यानंतर शमीने मोईन अलीला षटकार ठोकत कसोटीतील दुसरे अर्धशतक ठोकले. १०६व्या षटकात शमीने इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीला उत्तुंग षटकार ठोकला आणि आपली बॅट चौफेर दाखवली.

 

 

हेही वाचा – ऑलिम्पिक चॅम्पियन्ससोबत पंतप्रधान मोदींची ‘नाश्ते पे चर्चा’, BJPनं शेअर केले फोटो

शमी-बुमराह जोडीने इंग्लंडमधील १९८२चा कपिल देव-मदन लाल यांचा नवव्या गड्यासाठी ६६ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडित काढला. लॉर्ड्सवर एक-एक धाव घेताना संपूर्ण टीम इंडिया संघ शमी-बुमराहसाठी टाळ्या वाजवत होता.  लंचपर्यंत भारताच्या १०८ षटकात ८ बाद २८६ धावा झाल्या आहेत. बुमराह ३० तर शमी ५२ धावांवर खेळत आहे. भारताकडे आता २५९ धावांची आघाडी असून वेगवान गोलंदाज मार्क वुडने इंग्लंडसाठी आतापर्यंत ३ बळी घेतले आहेत.