Sai Sudharsan Golden Duck Reminds Gautam Gambhir Wicket: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटीच्या चौथ्या दिवशी गिल-राहुलच्या शतकी भागीदारीच्या जोरावर कमालीचं पुनरागमन करत संघाचा डाव सावरला आहे. इंग्लंडने पहिल्या सत्रात ६६९ धावा करत ३११ धावांची मोठी आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात भारताने खातंही न उघडता २ विकेट्स गमावले. ज्यात यशस्वी जैस्वाल डकवर तर साई सुदर्शन गोल्डन डकवर बाद झाला. साई सुदर्शनच्या विकेटवरून गौतम गंभीरच्या इंग्लंडमधील विकेटची आठवण झाली आहे.
इंग्लंडचा संघ चौथ्या दिवशी ६६९ धावा करत सर्वबाद झाला. रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स भारताकडून घेतल्या. दरम्यान चौथी कसोटी वाचवण्यासाठी भारताला चांगली फलंदाजीची गरज होती. सुरूवातीच्या दोन विकेट्स गमावल्यानंतर शुबमन गिल आणि केएल राहुल यांनी भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी रचली आणि चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न देता १७४ धावा केल्या आहेत. गिल ७८ धावा तर केएल राहुल ८७ धावा करत नाबाद परतले आहेत.
भारताला ख्रिस वोक्सच्या पहिल्याच षटकात दोन धक्के बसले. त्याने तिसऱ्या चेंडूवर स्लिपमध्ये रूटकरवी जैस्वालला झेलबाद केलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर पहिल्या डावात ६१ धावांची उत्कृष्ट खेळी करणाऱ्या साई सुदर्शनला ब्रूकने झेलबाद करत गोल्डन डकवर माघारी धाडलं.
साई सुदर्शनच्या गोल्डन डकने गंभीरची विकेटची करून दिली आठवण
साई सुदर्शनच्या विकेटने दशकभरापूर्वी गौतम गंभीर ज्या पद्धतीने बाद झालेला त्याची आठवण करून दिली. २०१४ मध्ये इंग्लंडविरूद्ध ओव्हल कसोटीत भारताचा सध्याचा कोच गौतम गंभीर पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला होता. २०१४ मध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर एक डाव आणि २४४ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात गंभीरला अँडरसनने बटलरकरवी पहिल्याच चेंडूवर झेलबाद केलं होतं.
भारत २०१४च्या ओव्हल कसोटीत पहिल्या डावात १४८ धावांवर बाद झाला होता. भारताकडून त्या सामन्यात कर्णधार धोनीने ८२ धावांची खेळी केली होती. त्याच्याशिवाय इतर फलंदाज १५ धावांचा टप्पाही गाठू शकले नव्हते. प्रत्युत्तरात इंग्लंडने जो रूटच्या १४९ धावांच्या खेळीच्या जोरावर ४८६ धावा करत मोठी आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या डावात भारत ९४ धावांवर सर्वबाद झाल्याने इंग्लंडने हा सामना एका डावाने जिंकला होता.
भारतीय संघाने सध्या सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने रूटच्या १५० धावा आणि बेन स्टोक्सच्या १४१ धावांच्या खेळीच्या जोरावर ६६९ धावांचा डोंगर उभारला आणि ३११ धावांची आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात खातंही न उघडता २ विकेट अशी झाली होती. तिथून राहुल आणि गिलने संघाचा डाव सावरत चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १७५ धावा केल्या. यासह भारतीय संघ आता १३७ धावांनी पिछाडीवर आहे.