Gautam Gambhir Discussion With Yashasvi Jaiswal: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये होणारी कसोटी मालिका सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. २० जूनपासून हेडिंग्लेमध्ये पहिला कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने कसून सराव करायला सुरूवात केली आहे. काही खेळाडू भारतीय अ संघाकडून खेळण्यासाठी आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाले होते. ज्यात सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालचा देखील समावेश आहे. मात्र इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात त्याची बॅट शांत राहिली.
इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध झालेल्या ४ डावात जैस्वालला २४,६४, १७ आणि ५ धावा करता आल्या. त्याची ही कामगिरी पाहता, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने यशस्वी जैस्वालसोबत चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे. रेव्हस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा सराव सुरू असताना, गौतम गंभीर आणि यशस्वी जैस्वाल चर्चा करताना दिसून आले.
यशस्वी जैस्वालने सलामीवीर फलंदाज म्हणून आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरूवात केली. इंग्लंड दौऱ्यावर डावाची सुरूवात करण्यासाठी तो प्रबळ दावेदार आहे. मात्र, सराव सामन्यात फेल होणं ही चिंता वाढवणारी बाब आहे. भारतीय अ संघाचे कर्णधारपद अभिमन्यू ईश्वरनकडे आहे. त्याने सराव सामन्यात फलंदाजी करताना २ अर्धशतकं झळकावली. यासह केएल राहुलने देखील शतकी खेळी केली. मात्र, जैस्वालला ५० धावांचा पल्ला गाठता आलेला नाही. इंग्लंडचा दौरा हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून कुठलीही चूक होणं अपेक्षित नाही. याच कारणामुळे गंभीर जैस्वालसोबत चर्चा करताना दिसून आला असावा असं म्हटलं जात आहे
भारतीय संघाला ही मालिका जिंकायची असेल, तर यशस्वी जैस्वालची बॅट चालणं खूप गरजेचं आहे. कारण कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. इंग्लंडविरुद्ध मायदेशात फलंदाजी करताना त्याने २ शतक आणि ३ अर्धशतकांसह ७१२ धावा चोपल्या होत्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही त्याने चांगली सुरूवात करून दिली होती. त्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यावरही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.