Kamran Akmal On Gautam Gambhir: आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. येत्या रविवारी (१४ सप्टेंबर) भारतीय संघाचा सामना पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. यावेळी या स्पर्धेचे आयोजन दुबईत करण्यात आले आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्याला कडाडून विरोधही केला गेला. पण भारत सरकारने दिलेल्या होकारामुळे हा सामना होणार आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने या सामन्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कामरान अकमलने दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांना विनंती केली आहे, की केवळ सामन्याचा आनंद घ्या. यादरम्यान त्याने २०१० मध्ये भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत झालेल्या वादावर देखील मोठा खुलासा केला आहे.
आशिया चषक २०१० स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेत केले गेले होते. या स्पर्धेत झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान गौतम गंभीर आणि कामरान अकमल यांच्यात झालेल्या वादाची तुफान चर्चा रंगली होती. आता १५ वर्षांनंतर कामरान अकमलने या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. अकमलच्या मते, जे काही झालं ते गैरसमज झाल्यामुळे झालं होतं.
गंभीरसोबत झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना कामरान अकमल म्हणाला, ” जे काही झालं ते गैरसमज झाल्यामुळे झालं होतं. गौतम गंभीर खूप चांगला आहे. आम्ही अ गटाकडून खेळण्यासाठी केनियाला एकत्र गेलो होतो. तेव्हापासून आम्ही खूप चांगले मित्र बनलो आहोत.”
नेमकं काय घडलं होतं?
मैदानावरील घटनाक्रम सांगताना कामरान अकमल म्हणाला, “त्या सामन्यात (आशिया चषक २०१०) त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फटका फसला आणि मी जोरदार अपील केली. त्यावेळी तो चुकीचा शॉट मारल्यामुळे स्वत:ची समजूत काढत होता. पण मला वाटलं तो मला काहीतरी म्हणाला. त्यामुळे आमच्यात गैरसमज झाला.”
तसेच भारत- पाकिस्तान सामन्याबद्दल बोलताना त्याने म्हटलं की, ” मला अशी आशा आहे की, भारत- पाकिस्तान सामन्यावेळी स्टेडियम पूर्ण भरलेलं असेल. क्रिकेटमुळे दोन्ही देशातील राजनैतिक तणाव दूर होऊ शकतो. त्यामुळे क्रिकेट होणं खूप गरजेचं आहे.” भारत सरकारनेही या सामन्यासाठी परवानगी दिली आहे. दोन्ही देश द्विपक्षीय मालिका वगळता इतर स्पर्धांमध्ये एकमेकांविरूद्ध खेळू शकतात.