Asia Cup Final IND vs PAK: आशिया चषक २०२५ चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. आशिया चषकाच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येतील. क्रिकेटचा चाहतावर्ग या सामन्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. दुबईत हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे, कारण या सामन्यासाठीची सर्व तिकिट विकली गेली आहेत. पण या सामन्यादरम्यान कोणकोणत्या गोष्टींवर बंदी घातली आहे, जाणून घेऊया.
आशिया चषकात भारत-पाकिस्तानचे संघ १५ दिवसांच्या कालावधीत तिसऱ्यांदा भिडणार आहेत. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. पण या सामन्यांदरम्यान अनेक घटना, वाद पाहायला मिळाले. ज्यामुळे हे सामने चर्चेचा विषय ठरले.
दुबई पोलिसांनी अनेक वस्तूंवर बंदी घातली आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि दंड करण्याची धमकी दिली आहे. त्यांनी या बंदी घातलेल्या वस्तूंची यादी देखील जारी केली आहे. दुबई पोलिसांनी आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्याला उपस्थित राहणाऱ्या चाहत्यांसाठी अनेक सूचना जारी केल्या आहेत. चाहत्यांना सामना सुरू नियोजित सुरुवात वेळेच्या किमान तीन तास आधी (भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ८ वाजता) स्टेडियममध्ये येण्याचा सल्ला दिला आहे.
प्रत्येक तिकिटावर फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जाईल आणि बाहेर गेल्यास पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे सामन्यादरम्यान स्टेडियममधून बाहेर पडणाऱ्या कोणत्याही चाहत्याला परत आत येऊ दिले जाणार नाही. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानचे चाहते झेंडे, बॅनर किंवा फटाके घेऊन जाऊ शकणार नाहीत, त्यामुळे अधिकृत वेबसाइटवर बंदी असलेल्या वस्तूंची यादी देखील पोस्ट करण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान या वस्तूंवर बंदी
फटाके, लेसर पॉइंटर आणि कोणत्याही धोकादायक वस्तू.
तीक्ष्ण वस्तू, शस्त्रे, विषारी पदार्थ आणि रिमोट-कंट्रोल्ड उपकरणे.
मोठ्या छत्र्या, कॅमेरा ट्रायपॉड, सेल्फी स्टिक
आयोजकांची परवानगी नसलेले बॅनर आणि झेंडे.
पाळीव प्राणी, सायकल, स्केटबोर्ड, स्कूटर आणि काचेच्या वस्तू.
नियमांचं पालन न केल्यास दंडात्मक कारवाई
दुबई पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, बंदी घातलेल्या वस्तू पकडल्या गेल्यास त्या व्यक्तील १.२ लाख ते ७.२४ लाख दंड आणि तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. याव्यतिरिक्त, वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांना २.४१ लाख ते ७.२४ लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी विशेष दल तैनात केले जात आहे.