Asia Cup 2025 IND vs PAK Handshake Controversy: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावरून झालेला वाद शिगेला पोहोचला आहे. १४ सप्टेंबरला आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला गेला, या सामन्यात भारताने ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. पण या सामन्यानंतर टीम इंडियाच्या कोणत्याच खेळाडूंनी पाकिस्तान संघाच्या खेळाडूंबरोबर हस्तांदोलन केलं नाही. या मुद्द्यावर मोठा वादंग पेटला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) हा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेतून काढून टाकण्याची विनंती केली आहे. पीसीबीचा दावा आहे की मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीदरम्यान हस्तांदोलन न करण्यास सांगितले होते. या घटनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) मॅच रेफरी बदलण्याच्या मागणीवर आयसीसीने अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. परंतु क्रिकबझच्या वृत्तानुसार, आयसीसीने हा प्रस्ताव नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीने आरोप केला आहे की पायक्रॉफ्टने खेळभावनेच्या दृष्टीने आयसीसी आचारसंहिता आणि एमसीसी नियमांचे उल्लंघन केले आहे.
पाकिस्तान संघ आशिया चषकावर बहिष्कार टाकणार?
रिपोर्ट्सनुसार, आयसीसीचं असं मत आहे की हस्तांदोलनाच्या घटनेत पायक्रॉफ्टचा फारसा सहभाग नव्हता आणि त्याने फक्त पाकिस्तानच्या कर्णधाराला संदेश देण्याचं काम केलं होतं. जेणेकरून नाणेफेकीदरम्यान एका कर्णधाराने दुसऱ्या कर्णधाराशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यास सर्वांसमोर होणारी लाजिरवाणी स्थिती टाळता येईल. तर, सामान्य मत असं आहे की एखाद्या सदस्याच्या मागणीवरून सामनाधिकारी बदलणं हे चुकीचं ठरेल आणि मग तशी परंपरा पुन्हा सुरू राहील, कारण सामनाधिकाऱ्यांची या प्रकरणात कोणतीही गंभीर भूमिका नव्हती.
पीसीबीने इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ते १७ सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिराती (यूएई) विरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकू शकतात. या सामन्यासाठी पायक्रॉफ्टची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामुळे पाकिस्तान हा सामना खेळणार की नाही; यावर सर्वांच्या नजरा आहेत. सुपर-४ च्या शर्यतीच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. जो संघ हा सामना हरेल तो स्पर्धेतून बाहेर पडेल.
पाकिस्तानने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि त्यापैकी एक जिंकला आहे आणि दुसरा गमावला आहे. निर्णय बदलल्यानंतरही जर पाकिस्तानी संघ पुढचा सामना खेळला तर तो अधिक चर्चेचा विषय ठरेल.