Asia Cup 2025 Haris Rauf Trolled: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सुपर फोर टप्प्यातील सामना आज खेळवला जात आहे. यापूर्वी झालेल्या गट टप्प्यातील सामन्यात हँडशेक वादावरून मोठा वाद पेटला होता. ज्यामुळे पाकिस्तानचा संघ चांगलाच संतापला होता. यानंतर आता पाकिस्तानच्या खेळाडूने मैदानावर अशी काही कृती केली आहे की ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत असून भारताला यामधून चिडवल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी २० सप्टेंबरला सराव सत्रादरम्यान हारिस रौफने सराव सोडून भारताच्या मीडियासमोर त्यांना चिडवलं आहे. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान हारिस रौफला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं आहे. भारताविरूद्ध गट टप्प्यातील सामन्यात रौफ पाकिस्तानच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हता.
हारिस रौफ सोशल मीडियावर ट्रोल
२० सप्टेंबरला जेव्हा पाकिस्तान संघ दुबईमध्ये सरावासाठी बाहेर पडला, तेव्हा वेगवान गोलंदाज हरिस रौफ त्याच्या हातांनी ६-० चा इशारा करताना आणि मोठ्याने “६-०” असे ओरडताना दिसला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानमध्ये सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरसंबंधित त्याने हे हातवारे केल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जातंय.
भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर केलं आणि पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उद्धवस्त केले. ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान, पाकिस्तानी सैन्याने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला. या व्हायरल व्हिडिओमध्ये हरिस रौफ हेच सांगत आहेत, की आम्ही तुमची ६ विमानं पाडली आणि तुम्ही एकही विमान पाडलं नाही, असा दावा सोशल मीडियावरील चाहते करत आहेत.
ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक यांच्यातील युद्ध सदृश परिस्थितीदरम्यान पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनीही अनेक वक्तव्य केली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला होता. दरम्यान सुपर फोर सामन्यात आता भारताविरूद्ध पाकिस्तान कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा असतील.