Asia Cup 2025 Imran Khan Big Statement on pakistan defeat: आशिया चषक २०२५ मध्ये सलग दुसऱ्यांदा भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला आहे. गट टप्प्यातील सामन्यानंतर सुपर फोरमध्येही पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. या विजयानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी संघातील खेळाडूंना चांगलंच ट्रोल केलं आहे आणि त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान संघाचा माजी कर्णधार इम्रान खानने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान सेनेवर हल्लाबोल करत लाज काढणारं वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर इम्रान खानने टीका केली आहे. तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इम्रान खानने म्हटलं आहे की जर भारताविरुद्धचा क्रिकेट सामना जिंकायचा असेल तर दोघांनीही फलंदाजीला उतरावं.

इम्रान खानने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आणि लष्करप्रमुखांबाबत मोठं वक्तव्य

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार इम्रान खानची बहिण अलीमा खान हिने सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, भारताविरुद्ध क्रिकेट सामने जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लष्करप्रमुख जनरल मुनीर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष नक्वी यांनी सलामीवीर फलंदाज म्हणून खेळावं, असे इम्रानने सुचवलं आहे. तर पंच हे पाकिस्तानचे माजी मुख्य न्यायाधीश काझी फैज इसा आणि पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा असावेत.

अलिमा म्हणाली की इम्रान खानच्या मते, तिसरे पंच इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरफराज डोगर असावेत. अलीमा हिने इम्रानला भारताकडून पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सलग दुसऱ्या पराभवाबद्दल सांगितलं. त्यानंतर इम्रान खान यांनी मोहसीन नक्वी आणि असीम मुनीर यांच्यासह इतरांवर टीका केली. दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा भारताने एकतर्फी पराभव केला.

१९९२ मध्ये पाकिस्तानला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या इम्रान खानने नक्वीवर त्यांच्या “अक्षमता” आणि “नातलगवाद” द्वारे पाकिस्तानी क्रिकेट उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत आले आहेत. ७२ वर्षीय इम्रानने फेब्रुवारी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालीन सरन्यायाधीश इसा आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजा यांच्या मदतीने जनरल मुनीर यांनी त्यांच्या पक्षाचा, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचा जनादेश चोरल्याचा आरोप केला आहे. २०२३ पासून तो अनेक प्रकरणांमुळे तुरूंगात आहे.