IND vs PAK National Anthem Blunder Video: आशिया चषक २०२५ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज लढत दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये सुरू आहे. भारतीय संघाने सुरूवातीपासूनच चांगली कामगिरी करत सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली आहे. पाकिस्तानने सामन्याची नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघाने गोलंदाजीने सामन्याला सुरूवात केली. सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीताच्या वेळी मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला.

पाकिस्तानने जरी नाणेफेक जिंकली असली तरी निर्णय मात्र भारताच्या बाजूने लागला आहे. भारतीय संघाने नाणेफेक गमावली पण संघाचा निर्णय गोलंदाजी करण्याचा होता. तर दोन्ही संघ प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता सामना खेळण्यासाठी उतरले आहेत.

पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी मैदानावर नेमकं काय घडलं?

क्रिकेटमधील स्पर्धांमध्ये जेव्हा दोन संघ सामना खेळण्यासाठी उतरतात. तेव्हा दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजवले जाते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात प्रथम पाकिस्तानचे राष्ट्रगीत होणार होते आणि त्यानंतर भारताचं राष्ट्रगीत होणार होतं. पण जेव्हा पाकिस्तानी संघाची राष्ट्रगीत वाजवण्याची पाळी आली, तेव्हा सर्वच खेळाडू राष्ट्रगीतासाठी तयार होते. पण त्याआधी एक वेगळं आयटम सॉन्ग सुरू झालं. हे गाणं सुमारे चार सेकंद वाजलं.

पाकिस्तानी संघाचं राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी जलेबी बेबी हे गाणं वाजवलं गेलं. पाकिस्तानचे खेळाडू ह्रदयावर हात ठेवून राष्ट्रगीतासाठी सज्ज झाले. पण तितक्यात जलेबी गाणं वाजू लागलं आणि खेळाडूंनी हात खाली घेत काय झालं अशा प्रतिक्रिया दिल्या. यानंतर लगेच पाकिस्तानचं राष्ट्रगीत सुरू करण्यात आलं. या संपूर्ण घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. सध्याच्या आशिया चषकात भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या सामन्यात यूएई संघाचा ९ विकेट्सने पराभव केला. तर पाकिस्तानने पहिल्या सामन्यात ओमानचा ९३ धावांनी पराभव केला.

भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्ध दणक्यात सुरूवात केली आणि दबाव कायम राखला आहे. हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहने विकेटसह सुरूवात केल्यानंतर कुलदीप यादव व अक्षर पटेलने पाकिस्तानच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. कुलदीपने एका षटकात लागोपाठ दोन विकेट घेतले. १५ षटकांनंतरही पाकिस्तानचा संघ १०० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. त्यामुळे संघ किती धावांच आव्हान भारताला देणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.