IND vs PAK: आशिया चषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानच्या संघाला सावधानतेचा इशारा दिला आहे.

भारतीय क्रिकेट संघ सध्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. या मालिकेत भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. या दरम्यान, रोहितने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. तिथे त्याने आशिया चषकाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘यावेळी मागच्या सारख्या चुका होणार नाहीत. आशिया चषकात भारतीय संघ नव्या पद्धतीने खेळणार आहे,’ असे रोहित म्हणाला.

हेही वाचा – मराठमोळे चंद्रकांत पंडित देणार शाहरुखच्या संघाला प्रशिक्षण! आर्यन खानने खास पोस्ट करून केले स्वागत

पाकिस्तानसोबतच्या सामन्याबाबत रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही गेल्या वर्षी दुबईत पाकिस्तान विरुद्ध खेळलो. त्या सामन्यात निकाल आमच्या बाजूने लागला नाही. मात्र, यावेळी तसे होणार नाही. यावेळी भारतीय संघ वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहे. वर्षभरात संघात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आशिया चषक स्पर्धेत आम्ही संघ म्हणून कशी कामगिरी करतो याकडे आमचे लक्ष असेल. पाकिस्तान असो, बांगलादेश असो किंवा श्रीलंका आम्ही फक्त चांगली कामगिरी करण्याकडे लक्ष देणार आहोत.”

२०२१मध्ये युएईमध्ये झालेल्या टी २० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. त्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा दहा गडी राखून पराभव केला होता. आयसीसी स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.