What Happened in Asia Cup Final Prize Ceremony: भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषक २०२५ चं जेतेपद आपल्या नावे केलं. आशिया चषक इतिहासात पहिल्यांदाच या दोन्ही संघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणं हे सामन्यापेक्षाही अधिक लक्षवेधी ठरलं. पण भारताच्या विजयानंतर मैदानावर नेमकं काय घडलं, पाहूया.
अंतिम सामना जिंकल्यानंतर, भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, कारण ही ट्रॉफी मोहसीन नक्वी यांच्या हस्ते देण्यात येणार होती. मोहसीन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेतच पण याचबरोबर ते पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष आणि पकिस्तान सरकारमध्ये मंत्रीपदावरही आहेत.
भारताच्या विजयानंतर सव्वातासात नेमकं काय काय घडलं?
आशिया चषक २०२५ चा पुरस्कार वितरण सोहळा बराच उशिरा सुरू झाला, परंतु केवळ वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, परंतु नक्वी व्यासपीठावरच उभे होते. पाकिस्तान संघाला उपविजेता संघाची मेडल्स देण्यात आली. पण भारतीय खेळाडूंनी मात्र अखेरपर्यंत ट्रॉफी स्वीकारलीच नाही. क्रिकेट मैदानावर पहिल्यांदाच अशी घटना घडली असेल. भारताचे खेळाडू प्रेंझेटेशन सेरेमनीदरम्यान मैदानावर बसलेले आणि झोपून मोबाईल पाहतानाही दिसले.
भारतीय संघ व्यासपीठावर असलेल्या एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास सज्ज होता, परंतु नक्वी यांनी ते होण्यापासून रोखलं. पुरस्कार सोहळा सुरू होण्यापूर्वी नक्वी बाजूला उभे राहिले. पण नक्वी मात्र आपल्या जागेवरून बिलकुल हटले नाहीत आणि यामुळेच पुरस्कार वितरण सोहळा सुरू होण्यास उशीर झाला. नक्वींनाच भारतीय संघाला मेडल्स आणि ट्रॉफी द्यायची होती. पण भारताने नकार दिल्यानंतर नक्वी यांनी ट्रॉफी घेऊन जाण्यास सांगितलं.
भारतीय संघ व्यवस्थापनाने विजेत्याची ट्रॉफी कोण सादर करेल असे विचारले होते आणि आशियाई क्रिकेट परिषदेने सल्लामसलत सुरू केली होती कारण त्यांना माहित होतं की भारतीय संघ नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारू इच्छित नाही. नक्वी स्टेजवर आल्यानंतर भारतीय चाहत्यांनी ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर हारिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी मेडल्स घेण्यासाठी मैदानावर आल्यावरही चाहत्यांनी त्यांची हुर्याे उडवली.
सूत्रसंचालक सायमन डुल यांनी पाकिस्तान संघाला मोहसीन नक्वी उपविजेत्याचे मेडल्स देतील, असं जाहीर केलं. पण नक्वींना या गोष्टीला नकार दिला आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अमिनूल इस्लाम यांच्या हस्ते संघाला मेडल्स दिले गेले. यानंतर मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाला उपविजेत्या संघाची बक्षीसाची रक्कमचा चेक दिला. जो त्याने पुढे जाऊन फेकून दिला आणि नंतर मुलाखतीसाठी पोहोचला.