Rishabh Pant Sixes Record In Test Cricket: भारतीय संघातील स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना ऋषभ पंतने नवा सिक्सर किंग बनण्याचा मान पटकावला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवाग अव्वल स्थानी होता. सेहवागच्या नावे ९० षटकार मारण्याची नोंद होती. आता ऋषभ पंतने हा विक्रम मोडून काढला आहे. इंग्लंड दौऱ्यावर असताना, पंतने सेहवागच्या सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. आता दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात १ षटकार मारताच त्याने सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सेहवागच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ९० षटकार मारण्याची नोंद होती. तर ऋषभ पंतने आतापर्यंत ९१ षटकार मारले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा, एमएस धोनी सारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

ऋषभ पंत- ९१ षटकार
वीरेंद्र सेहवाग- ९० षटकार
रोहित शर्मा- ८८ षटकार
रवींद्र जडेजा- ८० षटकार
एमएस धोनी- ७८ षटकार

पंतने केशव महाराजच्या गोलंदाजीवर स्टेपआऊट होऊन गगनचुंबी षटकार मारून हा विक्रम आपल्या नावावर केला. त्यानंतर त्याने आणखी एक १०२ मीटर लांब षटकार मारला. ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत ४ गडी बाद १५० धावांपर्यंत मजल मारली आहे.

पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल अवघ्या १२ धावा करत माघारी परतला. त्यानंतर केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदरने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. केएल राहुलने ३९ धावांची खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदरने २९ धावा केल्या. गिल ४ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर ऋषभ पंतने २७ धावांची खेळी केली.