IND vs SA Test Match Time Changed: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळवल्या जातील. येत्या १४ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. तर दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत खेळवला जाईल. कसोटी मालिकेतील हे दोन्ही सामने किती वाजता खेळवले जाणार आणि सामन्याच्या वेळेत झालेला बदल नेमका काय आहे, पाहूया.
भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी वेळेत बदल झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, काही दिवसांपूर्वी, या सामन्यातील लंचब्रेक आणि टी-ब्रेकमध्ये बदल होणार असल्याचेही वृत्त समोर आले होते. यामुळे परंपरागत चालत आलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल पहिल्यांदाच पाहायला मिळू शकतो.
भारतात कसोटी सामने सामान्यतः सकाळी ९:३० वाजता सुरू होतात. सामन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजता नाणेफेक होते. पण गुवाहाटीमधील सामन्याच्या वेळेत बदल होणार आहे. सध्या या बदलाची माहिती समोर येत आहे आणि बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांचेही याबाबतचे निवेदन समोर आलं आहे. तर क्रिकबझ आणि क्रिकइन्फोमध्येही सामन्याच्या बदललेल्या वेळा दिसत आहेत.
भारत-दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना किती वाजता सुरू होणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला सामना वेळापत्रकानुसार कोलकाता येथे होईल. पहिल्या दिवशी सकाळी ९:०० वाजता नाणेफेक होईल आणि खेळ सकाळी ९:३० वाजता सुरू होईल. त्यानंतर ११.३० ला लंचब्रेक होईल. दुसरे सत्र दुपारी १२:१० ते २:१० पर्यंत असेल, त्यानंतर दुपारी २:३० पर्यंत २० मिनिटांचा टी-ब्रेक असेल. शेवटचे सत्र दुपारी २:३० वाजता सुरू होईल, जे संध्याकाळी ४:३० किंवा ५ वाजता संपेल.
भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामन्याच्या वेळेत मोठा बदल
गुवाहाटीमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळेत आता बदल करण्यात आला आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोने बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, गुवाहाटी हे ईशान्य भारतात आहे आणि हिवाळ्यात तिथे सूर्य लवकर उगवतो आणि मावळतो. या कारणामुळे दुसरा कसोटी सामना अर्धा तास लवकर सुरू होणार आहे. म्हणजेच पहिल्या दिवशी सामन्याची नाणेफेक सकाळी ८.३० वाजता होईल आणि इतर सर्व दिवशी खेळ सकाळी ९ वाजता सुरू होईल.
भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याचे वेळापत्रक
१४ ते १८ नोव्हेंबर – भारत-द. आफ्रिका पहिला कसोटी सामना – कोलकाना
२२ ते २६ नोव्हेंबर – भारत – द. आफ्रिका दुसरा कसोटी सामना – गुवाहाटी
